दहा दिवसांत दोन कुपोषित बालिकांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा दिवसांत दोन कुपोषित बालिकांचा मृत्यू
दहा दिवसांत दोन कुपोषित बालिकांचा मृत्यू

दहा दिवसांत दोन कुपोषित बालिकांचा मृत्यू

sakal_logo
By

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. १३ : पालघर जिल्ह्यातील आणि मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम सावर्डे गावात दोन कुपोषित बालिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा दिवसांत हे दोन मृत्यू झाले आहेत. प्रशासनाने बालिकांच्या वजनात हेराफेरी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे मोखाड्यातील कुपोषितांच्या मृत्यूचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावातील अंगणवाडीतील दुर्गा कल्पेश निंबारे (११ महिने) ही बालिका सतत आजारी असायची. त्यामुळे पालकांनी तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंबर महिन्यात उपचारासाठी दाखल केले होते. तेथील उपचारानंतर जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचारादरम्यान दुर्गाचा रुग्णालयातच ३१ डिसेंबरला मृत्यू झाला. रोजगारासाठी भिवंडी तालुक्यात स्थलांतरित झालेल्या रेणुका मुकणे (तीन महिने) या बालिकेचा तेथेच ११ जानेवारीला मृत्यू झाला. दहा दिवसांच्या अंतरात सावर्डे येथील अंगणवाडी क्षेत्रातील दोन कुपोषित बालिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

जव्हार रुग्णालयात दुर्गा या बालिकेची डिसेंबर महिन्यात अंगणवाडी सेविकेने अंगणवाडीत तपासणी केली असता वजन नऊ किलो १०० ग्रॅम नोंद केली होती. त्यामुळे ती कुपोषित नसल्याची नोंद केली होती; मात्र दुर्गाला जव्हार दवाखान्यात नेले असता वजन सहा किलोच भरल्याचा आरोप तिचे वडील कल्पेश निंबारे व आई सविता निंबारे यांनी केला आहे. आमचे बाळ कुपोषित असल्याची माहिती अथवा त्याचा पोषण आहार दिला नसल्याची तक्रार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भिवंडी येथे मृत्यू झालेल्या रेणुका मुकणे या बालिकेची कोणत्याही अंगणवाडी सेविकेने तपासणी केली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

रुग्णालयात असूनही हजेरी पटावर नोंद
जिल्हा परिषद सदस्या कुसुम झोले आणि उपसरपंच हनुमंत पादिर यांनी मृत बालिकांच्या कुटुंबांची भेट घेत सांत्वन केले. तसेच अंगणवाडीत जाऊन हजेरी पुस्तक तपासले असता, दुर्गा निंबारे हिला दवाखान्यात दाखल असताना तिची हजेरी पटाला नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सावर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य, नागरिकांनी याबाबतची लेखी तक्रार पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बालविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

कारवाईसाठी पालकमंत्र्यांना निवेदन
बालके कुपोषित नसल्याचे दाखवण्यासाठी, अंगणवाडी सेविकेने मृत बालकांच्या वजनात हेराफेरी करत जादा वजनाची नोंद केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी या घटनेची सखोल चौकशी करून घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बालकांच्या मृत्यूप्रकरणी तक्रार माझ्याकडे आली आहे. सावर्डे येथे शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन घटनेची चौकशी करणार आहे. तसेच या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- कुलदीप जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी, मोखाडा