
ऊर्फी जावेदच्या जीवाला धोका
मुंबई, ता. १३ : भाजप नेत्या चित्रा वाघ मॉडेल ऊर्फी जावेद हिचे भररस्त्यात थोबाड फोडण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे ऊर्फीच्या जीवाला धोका असून वाघ यांच्यावर पोलिस कारवाई करण्याची तक्रार मुंबईतील वकील ॲड. नितीन सातपुते यांनी महिला आयोगाकडे दाखल केली आहे. सातपुते यांनी यासंदर्भात महिला आयोगाकडे लेखी आणि ऑनलाईन तक्रार केली आहे.
ऊर्फी जावेदच्या तोकडे कपडे परिधान करण्याच्या मुद्द्यावरून काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि ऊर्फीमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. वाघ यांनी ऊर्फीच्या पेहेरावावर आक्षेप घेत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती. ऊर्फीच्या वेशभूषेवरून चित्रा वाघ यांचे समर्थक ऊर्फीला ट्रोल करत असून तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकेच नव्हे, तर वाघ यांनी तिला भररस्त्यात थोबाडीत मारण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे वाघ आणि त्यांच्या समर्थकांकडून ऊर्फीच्या जीवाला धोका आहे. तिचे मॉब लिंचिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिला आयोगाने या प्रकरणात स्यु-मोटो याचिका दाखल करून चित्रा वाघ यांच्याविरोधात सीआरपीसी कलम १५४, भादंवि कलम १५३ (A) (B), ५०४, ५०६ (II) अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी ॲड. सातपुते यांनी केली आहे.