
म्हसोबा यात्रेत एसटीला सुमारे दहा लाख रुपयांची कमाई
मुरबाड, ता. १४ (बातमीदार) : म्हसोबा यात्रेत एसटीला सुमारे दहा लाख रुपयांची कमाई झाली आहे. म्हसोबा यात्रेसाठी शुक्रवार (ता. ६) पासून मुरबाड, कल्याण व नेरळ येथून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. एसटीच्या मुरबाड आगारातून म्हसोबा यात्रेसाठी एक हजारपेक्षा जास्त फेऱ्या झाल्या आहेत.
एसटीतर्फे म्हसा गावात कर्जत, नेरळकडे जाणाऱ्या प्रवाशांना एसटी आगाराच्या दक्षिण बाजूला, तर मुरबाड, कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांना उत्तर बाजूला स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. मुरबाड आगराकडून या यात्रेकरूंच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, सर्वसामान्य यात्रेकरू आपल्या कुटुंबासह एसटीने प्रवास करण्यास पसंती देत आहेत. ऐतिहासिक अशी म्हसोबा यात्रा गेल्या शुक्रवारपासून सुरू आहे. आतापर्यंत यात्रेमध्ये जवळपास पंधरा लाख भाविकांनी देवाचे घेतले असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रमुख विश्वस्त दशरथ पष्टे यांनी दिली. या यात्रेत बाजारात असलेल्या खेळणी, महिलांसाठी वापरले जाणारे नकली दागिने, मिठाई, ब्लँकेट अशा वस्तूंना भरपूर मागणी असल्याचे यावेळी दिसून आले. त्याचबरोबर येथे मनोरंजनासाठी असलेल्या आकाश पाळणा व मौत का कुवा येथेही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.