
पालिकेच्या संथ सर्व्हरचा मनस्ताप
धारावी, ता. १५ (बातमीदार) : विविध प्रकारचा कर भरणा, देयके अधिक जलद ऑनलाईन भरली जावीत, यासाठी पालिकेतर्फे नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत; मात्र अनेक ठिकाणी सर्व्हर संथ गतीने चालत असल्याने नागरिकांसह कर्मचारीवर्गालाही मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे. दादर येथील ग/उत्तर प्रभाग कार्यालयात सर्व्हर अनेकदा बंद अथवा संथ चालत असल्याने नागरिकांना अर्धा–अर्धा तास रांगेत उभे रहावे लागत असल्याने नागरिकांनी या ऑनलाईन प्रणालीबाबत संताप व्यक्त केला आहे.
पालिकेतून जन्म, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, पाणी देयक, कर भरणा आदीचे पैसे अदा करण्यासाठी नागरिकांना प्रभाग कार्यालयातील विविध विभागांत धावपळ करावी लागत होती. त्यातून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी पालिकेतर्फे प्रभाग कार्यालयात एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात, नागरिकांची धावपळ कमी करण्यासाठी ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले आहेत.
पालिकेच्या दादर पश्चिम येथील ग/उत्तर प्रभाग कार्यालयात असलेल्या नागरी सुविधा केंद्रातील सर्व्हर अनेकदा बंद असतो अथवा संथ चालतो. यामुळे केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दोन मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना किमान अर्धा तास रांगेत उभे राहून वाट पहावी लागत आहे. कामास वेळ लागत असल्याने केंद्रातील कर्मचारी व नागरिकांमध्ये वादही होत आहेत. यावर पालिका प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मनात असूनही तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा सेवा देण्यास विलंब होतो. ज्या वेळी तांत्रिक अडचणी नसतात, त्या वेळी नागरिकांचे काम जलद गतीने केले जाते.
- प्रशांत पाटणे, नागरिक सुविधा केंद्रप्रमुख, ग/ उत्तर प्रभाग कार्यालय