
आशियाई पाणपक्षांची माहिती एका क्लिकवर
नवीन पनवेल, ता. १५ (वार्ताहर)ः पनवेल महापालिका क्षेत्रात असलेल्या तलावांमध्ये विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी येत असतात. त्यामुळे पक्ष्यांबाबतच्या माहितीच्या दस्ताऐवजी करण्यासोबत त्यांची गणना करण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेल पालिका क्षेत्रात येणाऱ्या चाळीसहून अधिक प्रकारच्या विविध प्रजातींच्या पक्ष्यांची माहिती एका क्लिकवर पनवेलकरांना मिळणार आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमाच्या अंतर्गत आशियाई पाणपक्षी गणना २०२३ या विषयास अनुसरून पाणपक्ष्यांची माहिती देणारे संकेतस्थळ व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वडाळे तलाव येथे नुकतेच झाले. यावेळी महापालिका क्षेत्रातील वडाळे, खांदेश्वर, तसेच इतर पाणथळ तलावांमध्ये हिवाळ्यात परदेशातून येणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या माहितीपर ‘आशियाई पक्षी गणना २०२३’ ही माहिती पुस्तिका छापण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. तसेच स्थलांतरित पक्ष्यांबाबत http://www.birdsofpanvel.blogspot.in या संकेत स्थळावरही माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
----------------------
शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांना स्थलांतरित पक्ष्यांची माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या फोटोसहीत नावांचे पोस्टर्स या ठिकाणी मांडण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पिल्लई आर्ट, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाला लोकनेते दि. बा. पाटील शाळेचे विद्यार्थी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.