
आयएमए संघटनेची शहापुरात शाखा
खर्डी, ता. १६ (बातमीदार) : वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस, एमएस व एमडी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असणाऱ्या महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शहापूर शाखेचे उद्घाटन मकर संक्रांतीच्या पूर्व संध्येला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात २३५ शाखा व तब्बल ४८ हजार सदस्य असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या शहापूर शाखेच्या तालुका अध्यक्षपदी शहापुरातील दीपस्मृती नर्सिंग होमचे नावाजलेले स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.अविनाश बढीये यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी डॉ. विलास सुरोशे तर खजिनदारपदी डॉ. स्वप्नाली घेगडे यांची निवड करण्यात आली आहे. नर्सिंग होम नोंदणी व नूतनीकरण, जैविक कचरा निर्मूलन, स्टाफ नर्स, फायर ऑडिट विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यासारखी आव्हाने असल्याचे राज्य अध्यक्ष डॉ. कुटे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
------------------------
खर्डी : शहापूर तालुका अध्यक्षपदी डॉ. अविनाश बढीये, सचिवपदी डॉ. विलास सुरोशे व खजिनदारपदी डॉ. स्वप्नाली घेगडे यांची निवड झाल्यावर मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.