
कचरा संकलनात वाहनांचा अडथळा
घणसोली, ता. १६ (बातमीदार)ः घणसोली सेक्टर ४ मध्ये मोकळ्या भूखंडावर असलेले भाजी मार्केट उठवल्याने व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पदपथांवरच व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. अशातच अनेक ठिकाणी काही चारचाकी वाहने गेल्या अनेक दिवसांपासून एकाच जागी उभी आहेत. त्यामुळे या वाहनांखालीच या व्यापाऱ्यांकडून कचरा टाकला जात असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
घणसोलीत पदपथांवर व्यापाऱ्यांकडून भाजी विक्रीसाठी वापर केला जात आहे. याठिकाणी रस्त्याच्या कडेला अनेक चारचाकी वाहने उभी आहेत. अनेकदा हे भाजी विक्रेते उरलेला कचरा किंवा घाण या गाड्यांच्या खाली ढकलून देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून सफाई कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. या कचऱ्यामुळे परिसरात घूस, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच या परिसरात या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या प्रयत्नांनाही बाधा पोहोचत आहे.
--------------------------------------------
रस्त्यावरील सर्व कचरा उचलण्याचा पालिका कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो; पण अनेकदा गाड्यांच्या खाली साचलेला कचरा उचलणे जमत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नियमावली देऊन एक दिवसाआड वाहनांची जागा बदलण्यासाठी सांगितले पाहिजे.
- संजय पाटील, स्वच्छता निरीक्षक, घणसोली
---------------------------
घणसोलीतील सेक्टर ४ परिसरात अनेक वाहने कित्येक महिने एकाच जागेवर उभी आहेत. त्यात या वाहनांखाली मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि इतर कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे.
- निकिता लोखंडे, रहिवासी