स्वच्छतेसाठी रात्रीचे जागते रहो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतेसाठी रात्रीचे जागते रहो
स्वच्छतेसाठी रात्रीचे जागते रहो

स्वच्छतेसाठी रात्रीचे जागते रहो

sakal_logo
By

जुईनगर, ता. १६ (बातमीदार)ः नेरूळ सेक्टर २ मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंटमधील रहिवाशांनी प्रभागात कचरा टाकणाऱ्यांविरोधात मोहीम घेतली आहे. त्यानुसार प्रभागात रात्रीची गस्त घातली जात आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानामध्ये खारीचा वाटा उचलत शहराचे नाव उंचावण्यासाठी रहिवाशांकडून होणारे प्रयत्न प्रेरणादायी ठरत आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकू नये, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. असे असताना काही नागरिक रस्त्यावर तसेच इतर मोकळ्या जागांवर कचरा फेकत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी परिसराला बकालपणा आला आहे. नेरूळ परिसरातील काही विभागांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. येथे अनेक ठिकाणी ओल्या-सुक्या कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे रहिवाशांनाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. नेरूळ सेक्टर २ मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंटमधील रहिवाशांनी स्वतःच हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसह इतर सोसायटीतील नागरिक कचरा फेकणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी रात्रीची गस्त घालत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणातील प्रयत्नांना रहिवाशांचेही पाठबळ मिळत आहे.
------------------------------------------
कारवाई करण्याची मागणी
कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी पालिकेने अनेक प्रभागांमधील कचराकुंड्या हटवल्या आहेत. मात्र, यामुळे नागरिक रस्त्यावर, मोकळ्या जागांवरच कचरा फेकत आहेत. त्यामुळे परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांना, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने कचरा फेकणाऱ्या व्यक्तींवर पालिकेच्या वतीने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.