
जव्हार तालुक्यात बोचरी थंडी वाढली
जव्हार, ता. १५ (बातमीदार) : जव्हारला निसर्गाचे थंड हवेचे एक मोलाचे योगदान आहे. त्यातच तापमानात प्रचंड घसरण झाल्याने सध्या थंडी बोचरी जाणवत आहे. त्यामुळे तालुक्यात लहानग्यांसह वृद्धांनादेखील घशाचा त्रास वाढला असल्याचे चित्र आहे.
मागील चार दिवसांपासून पारा घसरल्यामुळे सर्वत्र थंडी आणि जव्हार शहरात प्रवेश करतेवेळी सर्वत्र धुके पसरत असल्याचे चित्र दिसत आहे. पहाटे दव पडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. वातावरण बदलल्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या घशाचा संसर्ग तसेच आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घसा खवखवणे, घशात वेदना होणे, डोके दुखणे आदी तक्रारी जाणवत आहेत. त्यामुळे सध्या खासगीसह पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयात या तक्रारींचे दररोज शेकडो रुग्ण औषधोपचारांसाठी जाताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास अधिक आहे.
---------------
जव्हार शहर आणि ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठांना घसा खवखवीचा त्रास अधिक जाणवत आहे. रुग्णांनी बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. थंड हवेत कामाशिवाय बाहेर पडू नये. थंडीत बाहेर जाताना मास्क, कानटोपी वापरावी.
डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, पतंग शहा, उपजिल्हा रुग्णालय, जव्हार