
वाहन चोरीचे १९ गुन्हे उघड
नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील रिक्षा, तसेच दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. आलम रफिक खान (२३) व सलमान इकबाल शेख (२५) अशी दोघांची नावे असून विविध भागांतील वाहनचोरीचे १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
नवी मुंबई शहरात वाहन चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच अनुषंगाने एपीएमसी पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे गोवंडी परिसरात राहणाऱ्या दोन वाहनचोरांची माहिती मिळवली होती. त्यानुसार पोलिसांनी गोवंडी, मानखुर्द मुंबई परिसरात सापळा लावून आलम रफिक खान व सलमान इकबाल शेखला ताब्यात घेतले आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता एपीएमसी व कोपरखैरणे तसेच समतानगर, कळवा, मानखुर्द, बीकेसी, गावदेवी, देवनार, डीएन नगर, टिळक नगर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या रिक्षा व दुचाकीचे १९ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-----------------------------------
या चोरट्यांनी चोरलेल्या अनेक रिक्षांचे पार्ट वेगवेगळे करून विकल्या आहेत. तर या प्रकरणातील इतर दोघे साथीदार फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
-विवेक पानसरे, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-१