
फुप्फुसाव्यतिरिक्त टीबी असणाऱ्या रुग्णांच्या निदान आणि उपचारांसाठी बहुउद्देशीय टीबी युनिट सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न
बहुउद्देशीय टीबी युनिट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईत वाढत असलेल्या क्षयरोगाच्या प्रकरणांमुळे पालिका सार्वजनिक आरोग्य विभाग शिवडी टीबी रुग्णालयात २० खाटांचा बालरोग वॉर्ड सुरू करण्याचा विचार करत आहे. या वॉर्डव्यतिरिक्त आम्ही फुप्फुससंदर्भात नसलेल्या क्षयरोगाचे त्वरित निदान आणि उपचार करण्यासाठी शिवडी टीबी रुग्णालयात एक बहुउद्देशीय टीबी युनिटदेखील सुरू करू, असे पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
क्षयरोगाचे निदान करणे वाढत्या सुविधांमुळे सोपे झाले आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गोवंडीतील शताब्दी रुग्णालयातील पालिकेच्या टीबी कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारे डॉ. विकास ओसवाल म्हणाले, की चांगल्या निदान सुविधांमुळे लहान मुलांमधील क्षयरोगाचे निदान लवकर होऊन रुग्ण वाढत आहेत.
लहान मुलांपैकी जवळपास ६० टक्के टीबी प्रकरणे एक्स्ट्रा पल्मोनरी आहेत. औषध-प्रतिरोधक क्षयरोग हे गेल्या दशकात सार्वजनिक आरोग्याच्या सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. औषध-संवेदनशील टीबीदेखील गंभीर स्वरूपात दिसून येत आहे. हाडांचा क्षयरोग असलेल्या मुलाला औषध-संवेदनशील उपचार असले तरीही एक वर्षाच्या उपचारांची आवश्यकता असते.
- डॉ. इरा शाह, टीबी कार्यक्रम प्रमुख, वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटल
बहुउद्देशीय टीमची गरज
क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिली जाणारी औषधे ही अधिक ताकदीची असतात. त्यांच्यामुळे अनेकदा गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अनेक मुलांचे बारकाईने निरीक्षण करायला हवे. अशा वेळेस बहुउद्देशीय टीम असणे आवश्यक आहे, असे मत वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटलच्या टीबी कार्यक्रम प्रमुख डॉ. इरा शाह, यांनी व्यक्त केले आहे.
मुलांसाठी अधिक बेड्स हवेत
क्षयरोग शरीरातील इतर अवयवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो, पण श्वसनविकार आणि फुप्फुसाचा क्षयरोग जास्त संसर्गित असून एक रुग्ण वर्षभरात १५ रुग्णांना संसर्ग देऊ शकतो. यामुळेच फुप्फुसाचा क्षयरोग असणाऱ्या रुग्णाला एकाच वॉर्डमध्ये दुसऱ्या रुग्णासोबत उपचार दिले जात नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या व्यवस्थापनासाठी जास्तीत जास्त बेड्स उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.