पूर्व उपनगर लवकरच पूरमुक्त

पूर्व उपनगर लवकरच पूरमुक्त

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः गेल्या १० वर्षांपासून रखडलेला माहुल पम्पिंग स्टेशन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मिठागराची ६.१७६ जागा मुंबई महापालिकेला देण्यास तयारी दर्शवल्याने पम्पिंग स्टेशनचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पालिकेला केंद्राकडून मिळणाऱ्या‍ जागेच्या बदल्यात ११८ कोटींचा मोबदला द्यावा लागणार आहे.
या पम्पिंग स्टेशनमुळे मुसळधार पावसात सखल भाग व रेल्वे परिसरात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पूर्व उपनगर पूरमुक्त होण्यासाठी या पम्पिंग स्टेशनची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात घेतलेल्या आढावा बैठकीत या पम्पिंग स्टेशनसाठी पालिकेकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना काही महिन्यांपूर्वी दिली होती.
मुंबईत मुसळधार पावसात सखल भागांत पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. रेल्वे परिसरातील किंग्ज सर्कल, शीव, गांधी मार्केट, नेहरूनगर, माटुंगा, सिंधी सोसायटी, चेंबूर, कुर्ला हा सखल भाग व रेल्वे परिसरात पाणी साचते. रेल्वे रुळांवर पाणी तुंबल्याने रेल्वेसेवा ठप्प पडून जनजीवन विस्कळित होते. यावर उपाय म्हणून पालिकेने २००६ मध्ये ब्रिमस्ट्रोवॅड उपक्रमांतर्गत हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पम्पिंग स्टेशन उभारली आहेत. यामध्ये सेकंदाला हजारो लिटर पाणी समुद्रात फेकणे शक्य होत आहे.

माहुल पम्पिंग स्टेशन बांधण्याचा प्रस्ताव पालिकेचा होता. मिठागराच्या जागेसाठी केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा मिळवण्याकरिता सातत्याने प्रयत्न पालिकेने सुरू ठेवला होता. या पार्श्वभूमीवर मिठागराची जागा देण्याची तयारी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे १० वर्षांनंतर माहुल पम्पिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे.

येथे असेल हे केंद्र
‘एमबीपीटी’ रोडच्या बाजूने माहुल खाडी, वडाळा येथे माहुल नाल्याजवळ हे पम्पिंग स्टेशन उभारले जाणार आहे. नाला, खाडीजवळ असल्याने मुसळधार पावसात येथून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करून बाहेर फेकणे सोपे जाणार आहे. त्यामुळे परिसर पूरमूक्त होण्यास मदत होईल.

या भागांना फायदा
किंग्ज सर्कल, शीव, गांधी मार्केट, नेहरूनगर, माटुंगा, सिंधी सोसायटी, चेंबूर, कुर्ला आणि रेल्वे मार्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com