
ग्राहकांच्या बँक खात्यातून सव्वा कोटींचा अपहार
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : राज्यभरातील हजारो ऑनलाईन पेमेंट रिटेलर्सपैकी ३६ जणांनी हजारो ग्राहकांच्या बँक खात्यातून परस्पर तब्बल एक कोटी १८ लाख रुपये काढून त्याचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी आधारकार्ड व फिंगरप्रिंट, तसेच संगणकीय साधनांचा वापर करण्यात आला. वाशी पोलिसांनी ३६ रिटेलर्सविरोधात फसवणूक, अपहार, तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
ग्राहकांना बँकिंग क्षेत्रामध्ये व्यवहार करणे सुकर व्हावे, यासाठी वाशीतील व्ही. के. वेंचर प्रा. लि. या कंपनीने बँकिंग व ई-कॉमर्स (फिनटेक) यांना एकत्रित केले आहे. तसेच विविध बँकिंग प्रणालीसोबत भागीदारी केली आहे. कंपनीमार्फत नोंदणीकृत असलेल्या राज्यभरातील हजारो रिटेलर्सना मनी ट्रान्स्फर, आधारकार्डच्या माध्यमातून पैसे काढणे, मोबाईल रिचार्ज करणे, मायक्रो एटीएम, बिल पेमेंट व इतर सेवा दिल्या जातात. त्यानंतर सदर रिटेलर हे स्थानिक क्षेत्रामध्ये ग्राहकांना सुविधा देतात. ही सर्व यंत्रणा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या निकषानुसार कार्यरत असते. या कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या ३६ रिटेलर्सनी ऑगस्ट २०२२ ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत ग्राहकांचे आधारकार्ड व फिंगरप्रिंट, तसेच संगणकीय साधनांचा वापर करून ग्राहकांच्या बँक खात्यातून एक कोटी १८ लाख रुपये काढण्यात आले. त्यामुळे ग्राहकांनी संबंधित बँकेकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी कंपनीच्या नोंदणीकृत असलेल्या येस बँकेकडे तक्रार दिली होती.
ग्राहकांना रक्कम परत
रिटेलर्सने ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यातून रक्कम काढल्याने व्ही. के. वेंचर्स कंपनीला सदरची रक्कम ग्राहकांना परत द्यावी लागली. त्यामुळे कंपनीने तपासणी केली असता ३६ रिटेलर्सनी ग्राहकांच्या खात्यातून संमतीशिवाय रक्कम काढून त्याचा अपहार केल्याचे आढळून आले. त्यामुळे कंपनीने ३६ रिटेलर्सविरोधात तक्रार दाखल केली.