
आफताबला फाशीपेक्षा कठोर शिक्षा व्हावी
नालासोपारा, ता. १७ (बातमीदार) : वसई तालुक्यातील माणिकपूर आणि तुळिंज पोलिसांनी श्रद्धाच्या तक्रारीचा योग्य तपास केला असता तर आज माझी मुलगी जिवंत असती. या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याला फाशीपेक्षाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी तिचे वडील विकास वालकर यांनी केली. श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या तपासाबातत माहिती घेण्यासाठी आज (ता. १७) त्यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेतली. या वेळी हत्याकांडाचा तपास तातडीने करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांकडून समाधानकारक तपास सुरू आहे. लवकरच चार्जशिट दाखल करण्यात येणार आहे; मात्र वसईतील माणिकपूर आणि तुळिंज पोलिसांनी तपास योग्य केला असता तर आज माझी मुलगी जिवंत असती. त्यामुळे याप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तात्काळ तपास करावा आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. माणिकपूर आणि तुळिंज पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा तपास वसई परिमंडळाचे सहायक पोलिस आयुक्त करत असल्याचे मिरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.