
घरफोड्या करणारी टोळी गजाआड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : सराईतपणे घरफोडी, चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मालाड पोलिसांनी जेरबंद केले. मुंबईतून रेल्वेने पळून जात असताना पोलिसांनी मध्य प्रदेशातील रतलाम येथून तीन चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीचे सदस्य पश्चिम बंगालचे रहिवासी असून त्यांच्यावर देशातील विविध राज्यांमध्ये सलग २५ वर्षांपासून १०० हून अधिक घरफोड्या व चोऱ्यांचे गुन्हे नोंद आहेत.
निजाम शेख, अक्सर शेख, अन्वर शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १० लाख रुपयांचा मौल्यवान ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. या सर्वांकडून घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले. या टोळीने मुंबईतील खार, मालाड, जोगेश्वरी, मिरा रोड अशा अनेक भागांत बंद घरांत चोऱ्या केल्या आहेत. या आरोपींकडून मुंबईत सुमारे १० लाखांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह चोरलेल्या महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
...
असा काढला माग
११ जानेवारीला मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत लिबर्टी गार्डन परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात मालाड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत तपास सुरू केला. परिसरात आणि मुंबईच्या अन्य भागांतील ७० ते ८० सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. पोलिसांना आरोपी मुंबई सेंट्रल टर्मिनस येथून राजधानी एक्स्प्रेसने मुंबईतून बाहेर पळून जात असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी राजधानी एक्स्प्रेसमध्ये सापळा रचला आणि मध्य प्रदेशात रतलाम येथे गाडी पोहोचताच रेल्वे पोलिसांच्या मदतीने अटक केली.