ठाणेकरांच्या सेवेत ई-बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणेकरांच्या सेवेत ई-बस
ठाणेकरांच्या सेवेत ई-बस

ठाणेकरांच्या सेवेत ई-बस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : येऊरसारखा जैवविविधतेने नटलेला डोंगर लाभलेल्या ठाणे शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये आहे. ‘स्वच्छ, सुंदर ठाणे’ शहर आता आणखीनच बदलू लागले आहे. शहरातील भिंती बोलू लागल्याने या शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे शहराची वाहिनी समजल्या जाणाऱ्या परिवहन सेवेचे बदलते रूप लवकरच ठाणेकरांना अनुभवण्यास मिळणार आहे. ‘ब्रीथ ईझी, झिरो इंमिशन, नो नॉईज’ अशा पर्यावरणपूरक ई-बस ठाणे शहराला एक नवीन ओळख देणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्‍पष्‍ट केले.
स्वच्छ वायू कृती आराखड्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात बैठक पार पडली. या वेळी ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून इलेक्‍ट्रिकल बस उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. यात अत्याधुनिक ई बस परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले. स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत महापालिकेस २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ साठी अनुदान प्राप्त झाले आहे. या अंतर्गत १२३ ई बस खरेदी करण्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. जानेवारी २०२३ अखेरपर्यंत ३२ ई बस प्राप्त होणार असून जून २०२३ पर्यंत उर्वरित ९१ ई-बस प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत. या बस दिलेल्या वेळेतच प्राप्त होतील, याची दक्षता घ्यावी; जर या कामी विलंब झाला, तर करारनाम्यातील अटींनुसार ठेकेदारास दंड आकारला जाईल, असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. नव्याने उपलब्ध होणाऱ्या बस महापालिका क्षेत्रात सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या डिझेल बसच्या मार्गिकेवर चालविण्याचे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. जेणेकरून नागरिक सार्वजनिक वाहतुकीवर भर देतील व परिवहन सेवेचे उत्पन्न प्रतिकिलोमीटर वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
....................
मशीन खरेदी
शहरामध्ये सद्यस्थिती मॅन्युअल स्विपिंग सुरू आहे. मॅन्युअल स्विपिंगचा दर्जा वाढविण्यासाठी एका बाजूला जेव्हा प्रयत्न केले जातात, त्याच वेळी शहरातील मोठ्या काँक्रीटच्या रस्त्यावर मशीनच्या साह्याने साफसफाई सुरू केली, तर हे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी अधिक मदत होईल. जगभरातील सर्व आधुनिक शहरांमध्ये मेकॅनिकेल डस्‍ट स्‍विपिंग मोठ्या प्रमाणावर केली जाते. ती बाब यामध्ये समाविष्ट करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
...............................
शहरातील स्मशानभूमींमध्ये गॅस किंवा इलेक्ट्रिक शवदाहिनी
सध्या ज्या स्मशानभूमीमध्ये गॅस किंवा इलेक्ट्रिक शवदाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा स्मशानभूमीमध्ये नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ठाणे शहराने भविष्यामध्ये पर्यावरणपूरक उपक्रमांच्या आधारे पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्वच्छ वायू कृती आराखड्याअंतर्गत सर्व स्मशानभूमींमध्ये इलेक्‍ट्रिक आणि गॅस शवदाहिन्या उपलब्ध करून द्याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे.
..........................
अनुदानातून राबविले लोकोपयोगी उपक्रम
अनुदानातून माजिवडा व विटावा नाका येथे मिस्‍ट फाऊंटनची उभारणी, वर्तकनगर येथे सायकल मार्गिका, आनंदनगर ईवा स्कूल येथे वृक्षलागवड, अद्ययावत फिरती प्रयोगशाळा व लोकमान्यनगर येथील स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामासाठी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती या वेळी आयुक्त बांगर यांनी दिली.