उद्यानांकडे मुलांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यानांकडे मुलांची पाठ
उद्यानांकडे मुलांची पाठ

उद्यानांकडे मुलांची पाठ

sakal_logo
By

जुईनगर, ता. १८ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध विभागांमध्ये उद्याने उभारण्यात आलेली आहेत; मात्र अनेक विभागांमधील उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झालेली आहे. जुईनगर विभागातील सेक्टर २३ मध्ये शाहीर कृष्णा पाटील उद्यान याच अनास्थेचे बळी ठरले असून तुटलेल्या खेळण्यांमुळे लहान मुलांनी पाठ फिरवली आहे.
नवी मुंबई महापालिकेने सुनियोजित शहर तयार करताना प्रत्येक नोडमध्ये उद्यानांची निर्मिती केली आहे. या उद्यानांमुळे परिसरातील नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे पालिकेनेही उद्यानांमध्ये लाखो रुपये खर्च करून खेळणी तसेच अन्य सुविधा तयार केल्या आहेत; पण या खेळण्यांच्या दुरुस्ती-देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या उद्यानातील लहान मुलांसाठी उभारलेल्या खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. या उद्यानामधील घसरगुंडी, सी-सॉ, झोके तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नेहमीच वर्दळ असलेल्या या उद्यानात तुटलेल्या खेळण्यांमुळे मुलांचा हिरमोड होत आहे.
---------------------------------------------
पालकांमध्ये अपघाताची भीती
या उद्यानात सकाळ-संध्याकाळ खेळण्यासाठी मोठ्या संख्येने मुले येतात; पण तुटलेली खेळण्यावर मुले खेळत असतात, त्यामुळे इथे अपघातदेखील होऊ शकतो. अनेक वेळा तर पालक अपघात होण्याच्या भीतीपोटी मुलांना खेळायला पाठवत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या दुर्लक्षांमुळे अनेक मुलांना खेळापासून वंचित राहावे लागत आहे.
-----------------------------------------------
संध्याकाळच्या वेळी मुलांना आवर्जून खेळायला घेऊन येतो; मात्र इथे खेळणी तुटल्यामुळे खेळता येत नाही. त्यामुळे पालिकेने उद्यानातील खेळणी लवकरात लवकर दुरुस्त करावीत.
- रणजित चक्रवर्ती, पालक