खारघरमध्ये मरणानंतरही यातना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये मरणानंतरही यातना
खारघरमध्ये मरणानंतरही यातना

खारघरमध्ये मरणानंतरही यातना

sakal_logo
By

खारघर, ता. १८ (बातमीदार) : मरण पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार तरी निर्विघ्नपणे पार पडावेत अशी अपेक्षा असते, पण खारघर सेक्टर १४ मधील स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या स्मशानभूमीतील शवदाहिनी बंद असल्याने तब्बल दोन तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आल्यामुळे या प्रकाराबाबत संतापाची भावना व्यक्त होत आहे.
सिडकोने खारघर सेक्टर १४ मधील स्मशानभूमीत अत्याधुनिक पद्धतीची गॅस शवदाहिनी उभारली आहे. हा प्रकल्प पालिकेकडे हस्तांतर झाल्यावर पालिकेने काही दिवसांपूर्वी गॅस शवदाहिनी सुरू केली. दरम्यान, मंगळवारी (ता. १७) सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झालेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांसह नागरिक सहभागी झाले होते. अशातच शेवटचा विधी करून मृतदेह शवदाहिनीत ठेवण्यात आला असताना गॅस जोडणी बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे जवळपास दोन तास अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले होते. अखेर नातेवाईकांना शवदाहिनीत ठेवलेल्या मृतदेहाचे लाकडावर अंत्यसंस्कार करावे लागले, पण या गोंधळामुळे अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या नागरिकांना झालेल्या मनस्तापामुळे संतापाची भावना आहे.
-----------------------------------------------
पालिकेकडून ठेकेदाराकडे विचारणा
संबंधित प्रकरण पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर याबाबत संबंधित ठेकेदारकडे विचारणा केली गेली होती, पण गॅस जोडणीचे देयक ऑनलाईन भरून पुरवठा झाला नसल्याने शवदाहिनी बंद असल्याचे कारण समोर आले आहे. याबाबत महानगर गॅस एजन्सीकडे विचारणा केली असता, देयकाची पडताळणी झाली नसल्याने गॅस जोडणी बंद असल्याचे सांगण्यात आले.
------------------------------------
अंत्यविधीच्या साहित्यासाठी कमिशन
खारघरच्या स्मशानभूमीत अनेक वेळा शवदाहिनी बंद असते; तर कधी लाकडे नसतात. तसेच अंत्यविधीसाठी परस्पर साहित्य आणल्यास संबंधित व्यक्तीकडे कमिशन मागितले जात असल्याचे प्रकार घडतात. तीन वर्षांपूर्वी तर या स्मशानभूमीत लाकडे नसल्यामुळे आणलेला मृतदेह नवी मुंबईच्या बेलापूरच्या स्मशानभूमीत घेऊन जाण्याची वेळ नातेवाईकांवर आली होती.
----------------------------------------------
सेक्टर १४ मधील नागरिकांसाठी असलेली स्मशानभूमीतील शवदाहिनी बंद असते. त्यामुळे या स्मशानभूमीची योग्य प्रकारे देखभाल करणे गरजेचे आहे.
- जयेश गोगरी, सदस्य, शाश्वत फाऊंडेशन
-----------------------------------------
गॅस एजन्सीची चूक लक्षात येताच त्यांनी दहा मिनिटांत गॅस जोडणी करून शवदाहिनी सुरू केली. तसेच झालेल्या प्रकाराबाबत गॅस एजन्सीला ताकीद देण्यात आली आहे.
- वैभव विधाते, सहायक आयुक्त, पनवेल महापालिका
---------------------------