पंतप्रधानाच्या हस्ते पालिकेच्या प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

पंतप्रधानाच्या हस्ते पालिकेच्या प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

Published on

स्वनिधी योजनेतून लाखो फेरीवाल्यांना लाभ
पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण
मुंबई, ता. १८ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत असून महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात मोदी यांच्या उपस्थितीत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेतील २० दवाखान्यांचे लोकार्पण, तसेच सात मलजल प्रक्रिया केंद्र, महापालिकेच्या तीन रुग्णालयांच्या इमारती आणि ४०० किमीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत एक लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा शुभारंभही पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या मुंबई मलनिस्सारण प्रकल्प या खात्याद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या अंतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज २४६.४० कोटी लिटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. या केंद्रांसाठी १७ हजार १८२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मितीही केली जाणार आहे.
----
४०० किमीच्या रस्ते काँक्रिटीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील ३९७ किमी लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल. या कामाचा अंदाजे सहा हजार ७९ कोटी इतका खर्च असून हे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. त्याअंतर्गत शहर भागात ७२ किमी, पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर, तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
----
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा शुभारंभ
फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी जून २०२० मध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मुंबईतील एक लाखांहून अधिक फेरीवाल्यांना या योजनेंतर्गत कर्ज वाटपाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेने २४ विभागांमध्ये २३०१ शिबिरे आयोजित केली होती. त्यात पथविक्रेत्यांना ऑनलाईन अर्ज कसे करावे,‌ याबाबत माहिती देण्यात आली. आजपर्यंत एक लाख १६ हजारांहून अधिक अर्जदारांना या योजनेंतर्गत शिफारस पत्रे देण्यात आली आहेत, तर एक लाखांहून अधिक अर्जदारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
---
आरोग्यसेवेचे सक्षमीकरण
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महापालिकेच्या भांडुप मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, नाहूरगाव येथील ३६० खाटांचे रुग्णालय, तसेच सिद्धार्थनगर येथे ३०६ खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच ओशिवरा येथे १५२ खाटांच्या प्रसूतिगृहाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. त्याशिवाय ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेतील २० नव्या दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. येथे वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन, औषधोपचारासह विविध १४७ चाचण्या मोफत उपलब्ध असणार आहेत.
----
कडेकोट पोलिस बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. १९) मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत ड्रोन, पॅराग्लाइडर्स तसेच रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबतच वाहतुकीचेही नियमन करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच पाच पोलिस उपायुक्तांसह २७ सहायक पोलिस आयुक्त, १७१ पोलिस निरीक्षक, ३९७ इतर अधिकाऱ्यांसह तब्बल अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. त्याशिवाय ६०० महिला पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्या, दंगल विरोधी पथकाची एक तुकडी, तसेच शीघ्र कृती दलदेखील तैनात केले जाणार आहे.
----
सीएसएमटी स्थानकाचा होणार पुनर्विकास
केंद्र सरकारकडून देशभरातील १४ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून त्यात मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश आहे. सीएसएमटीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या (ता. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. सीएसएमटीचा ऐतिहासिक चेहरा कायम ठेवत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्याचा प्रकल्प भारतीय रेल्वेने हाती घेतला आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने अहमदाबाद, नवी दिल्लीसह सीएसएमटी स्थानकांच्या पुनर्विकासासाठी एकूण दहा हजार कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी सीएसएमटीच्या पुनर्विकासास १८१३ कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी खुली होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील पाच महिन्यांत कामास सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये रेल्वे ४० आणि खासगीची ६० टक्के गुंतवणूक असणार आहे.
----
आधुनिक सुविधा मिळणार
पुनर्विकास प्रकल्पात सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १८ येथे प्रवेश केल्यानंतर कॅफेटेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. स्थानकात प्रवाशांसाठी प्लाझा, रिटेल सेवा, कॅफेटेरिया, करमणूक सुविधा असतील. तसेच फूड कोर्ट, वेटिंग लाऊंज, स्थानिक उत्पादनांसाठी जागा दिली जाणार आहे. मेट्रो, बस वाहतुकीचे केंद्रीकरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com