नवी मुंबईत भगवा हीच बाळासाहेबांना आदरांजली ः केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत भगवा हीच बाळासाहेबांना आदरांजली ः केसरकर
नवी मुंबईत भगवा हीच बाळासाहेबांना आदरांजली ः केसरकर

नवी मुंबईत भगवा हीच बाळासाहेबांना आदरांजली ः केसरकर

sakal_logo
By

वाशी, ता. १८ (बातमीदार) ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना हा खऱ्या शिवसैनिकांनी एकवटलेला पक्ष जनतेची सेवा करत आहे. बाळासाहेबांची शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पूर्तता करणार आहे. जनतेचा आपल्यावर असणारा विश्वास अधिक दृढ करून आगामी कालावधीत नवी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवेल, हीच खरी बाळासाहेबांना जयंतीच्या निमित्ताने आदरांजली असेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना दस्तावेजांचे वाटप, दिनदर्शिका प्रकाशन आणि पक्ष प्रवेश आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. याववेळी मंत्री केसरकर यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात रोजगाराबरोबरच विविध प्रकल्प व विकासकामांची गंगा अवतरली आहे. मागील २२ वर्षांपासून घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न किशोर पाटकर यांच्या अखंडित पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. नवी मुंबईत आगामी कालावधीत सिडको आणि मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले.

या वेळी उपनेते विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात आलेल्या नवनवीन योजनांची माहिती उपस्थितांना दिली; तर आगामी कालावधीत नवी मुंबईकरांच्या समस्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांशी संवाद साधताना किशोर पाटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवी मुंबईचे प्रश्न तातडीने मार्गी लागल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले, युवानेते ममीत चौगुले, ज्येष्ठ नेते सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, जिल्हा संघटक सरोज पाटील, शीतल कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.