
जयप्रकाश छाजेड यांचे स्वप्न पूर्ण करणार
वडाळा, ता. १९ (बातमीदार) ः जयप्रकाश छाजेड यांना वडिलांकडून महात्मा गांधी विचारांचा वारसा लाभला; परंतु त्यांची जगण्याची एक वेगळी पध्दत होती. एस. टी. कामगाराला न्याय देणे हे त्यांचे स्वप्न होते, ते पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी छाजेड यांना आदरांजली वाहिली आहे.
केंद्रीय इंटकचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते आणि एसटी कामगार नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. महाराष्ट्र इंटकच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मनोहर फाळके सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सचिन अहिर यांनी श्रद्धांजली वाहिली.
या वेळी महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, कैलास कदम, देवराज सिंग आदी मान्यवरांनी आपल्या भाषणात जयप्रकाश छाजेड यांच्या कामगार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्याला उजाळा दिला.