थंडीमुळे बाजारात अंड्यांची दरवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थंडीमुळे बाजारात अंड्यांची दरवाढ
थंडीमुळे बाजारात अंड्यांची दरवाढ

थंडीमुळे बाजारात अंड्यांची दरवाढ

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १९ (वार्ताहर)ः पशुखाद्यात झालेली भाववाढ तसेच उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे अंड्यांची मागणी वाढली आहे. परिणामी बाजारात प्रतिअंड्यासाठी सात ते दहा रुपये; तर डझनाला ८० ते ९० रुपये मोजावे लागत असल्याने अचानक झालेल्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांवर झाला आहे.
सर्वसामान्यांपासून अगदी श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच आहारात अंड्यांचा समावेश असतो; पण याच अंड्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत. गेल्या महिन्यात अंडी ६० रुपये डझनने मिळत होती. आता अंड्यांचे दर तब्बल २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांपासून ते हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे. घाऊक बाजारात अंड्याचे दर वाढल्याने त्याचा परिणाम किरकोळ दरांवरही झाला आहे. परिणामी, केक शॉप, बेकरी व्यवसाय, हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे अंड्यांच्या वाढलेल्या भावामुळे पोल्ट्री व्यवसाय जरी तेजीत आला असला, तरीही इतर व्यवसायांवर त्याचा परिणाम होत असल्याने अंड्यांच्या वाढत्या भावावर नियंत्रण आणावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
----------------------------------
प्रोटिन असल्याने खवय्यांकडून मागणी वाढली आहे. सर्दी, पडसे दूर ठेवणारे म्हणून आरोग्यासाठी उत्तम म्हणून अंड्यांकडे पाहिले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रोटिनसाठी अंडे खाण्यावर भर दिला जात आहे.
- डॉ. संदेश गावंड, आयुर्वेदाचार्य, पनवेल