
काळू नदीवरील धरणाला विरोध
मुरबाड, ता. १९ (बातमीदार) : काळू नदीवरील धरणाला विरोध दर्शविण्यासाठी गुरुवारी मुरबाड तहसीलदार कार्यालय येथे काळू धरण प्रकल्प संघर्ष समिती व श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शहरी भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी काळू नदीवर धरण बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. काळू धरण बांधल्यास पाच गावे पूर्णतः व आठ गावे अंशतः बुडणार आहेत; तर कित्येक गावांचे रस्ते पाण्याखाली जाणार आहेत. धरण बांधण्यास परवानगी देताना ग्रामसभांचे संवैधानिक अधिकार डावलण्यात आले आहेत. स्थानिक लोकांना विश्वासात घेतलेले नाही. मोठे धरण बांधण्याऐवजी लहान बंधारे बांधले तर कोणत्याही गावाला विस्थापित करावे लागणार नाही, असे सांगत ग्रामस्थांनी धरणाला विरोध दर्शविला. यावेळी आरपीआय ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे आदींची भाषणे झाली. नंतर धरण बांधण्यास विरोध असल्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी संतोष निमसे, अशोक पठारे यांच्यासह तळेगाव, चासोळे, आंबिवली, झाडघर, वाकळवाडी परिसरातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
-------------------------
फोटो ओळी
मुरबाड : काळू नदीवर धरण बांधण्यास विरोध करण्यासाठी मुरबाड तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.