
घरात वेश्याव्यवसाय प्रकरणात सक्तमजुरी
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून त्यांच्या माध्यमातून घरामध्ये वेश्याव्यवसाय चालवून उपजीविका करणाऱ्या एका महिलेला ठाणे सत्र न्यायालयाने पिटा कायद्याअंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. याच प्रकरणात सहआरोपी असलेल्या अन्य एका महिलेची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.
तुर्भे स्टोअर्समधील के. के. आर रोड भागात राहणारी एक महिला घरामध्ये वेश्याव्यवसाय चालवून वेश्यागमनासाठी महिला व मुली पुरवत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० मे २०१८ रोजी सदर महिला चालवत असलेल्या कुंटणखान्यात बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली होती. त्यानंतर पोलिसांनी तुर्भे स्टोअर्स के. के. आर. रोड परिसरातील कुंटणखाना सुरू असलेल्या घरावर छापा टाकला होता. या कारवाईनंतर पोलिसांनी घरामध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून सदर महिलेला व घर मालकीण असलेल्या महिलेला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून महिलेविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी ठाणे सत्र न्यायालयात सुरू होती.