मच्छीमारांवर हवामानाची वक्रदृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मच्छीमारांवर हवामानाची वक्रदृष्टी
मच्छीमारांवर हवामानाची वक्रदृष्टी

मच्छीमारांवर हवामानाची वक्रदृष्टी

sakal_logo
By

वसई, ता. १९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील मच्छीमार अनेक संकटांचा सामना करत आहेत. अशात गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. या हवामान बदलामुळे माशांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे मासेमारीच्या अनेक बोटी या किनाऱ्यावर विसावल्या आहेत. यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत.
चक्रीवादळ, वादळी वारा, अवेळी होणारा पाऊस अशा एक ना अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवते. त्यातच समुद्रकिनारी जोरदार वारा व थंडीचे प्रमाण वाढल्याने जाळ्यांमध्ये मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पालघर, सातपाटी, डहाणू, अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव या प्रमुख मासेमारी बंदरांवर मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. तसेच येथून माशांची निर्यात देखील केली जाते. यातून मच्छीमारांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र सध्या जाळ्यात मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी समुद्रात काही अंतरावर मासे मिळत होते; परंतु वाढत्या जलप्रदूषणामुळे खोल समुद्रात मासेमारी करावी लागत आहे. त्यातच मासे जाळ्यात येतील याची शाश्वती नसते. त्यामुळे बोटी, खलाशी, कर्ज व इंधन यासह अन्य खर्च देखील काढता येणे कठीण झाले आहे, असे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व संकटांना तोंड देत असताना गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या थंडीचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. किनाऱ्यालगत थंडी वाढल्याने मासे आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे माशांची आवक कमी झाल्याने त्यांचे दर मात्र वाढले आहेत. एकीकडे मासे परदेशात निर्यात करण्यासाठी विमानसेवा, भारतातील इतर शहरात जाण्यासाठी खास रेल्वेची पार्सल सेवा सुरू करण्यात आली आहे; तर दुसरीकडे मासेच मिळत नसल्याने निर्यात व स्थानिक बाजारपेठेत गडद संकट उभे राहिल्याने मच्छीमार बांधव चिंतेत सापडले आहेत.
--------------
मासेमारीवर अनेक नैसर्गिक संकटे घोंघावत आहेत. सद्यस्थितीत थंडी व वारा जोर धरत आहे. त्यामुळे माशांची आवक कमी झाली आहे. जागतिक हवामानातील बदल पालघर जिल्ह्याला सतावू लागला आहे. त्यामुळे अनेक बोटी किनाऱ्यावर आहेत.
- विजय थाटू, अध्यक्ष, अर्नाळा फिशरमन सर्वोदय मच्छीमार सोसायटी
------------
पापलेट दुर्मिळ
हवामान बदलामुळे मच्छीमारांदेखील पापलेटचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मागणी असूनही पापलेट कमी येत आहेत. बाजारात ५०० ग्रॅम वजनापेक्षा अधिक वजन असणाऱ्या पापलेटला पूर्वी १२०० रुपये मोजावे लागत होते, मात्र आवक घटल्याने सध्या यासाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत.
--------------
सर्व्हेचा फटका
समुद्रात पाण्याचे थर असतात. अनेक शासकीय सर्व्हे केले जात आहेत. त्यामुळे त्या भागात मासे येत नाहीत. परिणामी मच्छीमारांना मासेमारीसाठी खोल समुद्रात जावे लागत आहे. त्यामुळे बोटीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या खर्चात वाढ होत आहे.
----------------
तांबूस मासा दिसेनासा
पूर्वी पालघर जिल्ह्यात तांबूस मासा मिळत होता; परंतु या माशांना हवे असलेले हवामान मिळत नाही. त्यामुळे पापलेटप्रमाणे मिळणारा ताम म्हणजे तांबूस मासा समुद्रात दिसेनासा झाला आहे.
---------------