
ठाण्यात आजपासून ऊर्जा २०२३ चे आयोजन
ठाणे, ता. १९ (बातमीदार) : मराठी विद्या परिषद (ठाणे विभाग) आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरंग एज्युकेशन सोसायटीमध्ये विद्यार्थ्यांसाठी एव्हरग्रीन सायन्स कार्निव्हल आणि संशोधन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला ऊर्जा २०२३ असे नाव देण्यात आले असून या मध्ये शुक्रवारपासून (ता. २० ते २२) रविवारपर्यंत आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. ‘पृथ्वी विज्ञान’ या विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
शुक्रवारी (ता. २०) संध्याकाळी ५ वाजता ‘ठाणे-तलावांचे शहर’चे उद्घाटन ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते मुख्य मैदान, श्रीरंग विद्यालय येथे होणार आहे. या वेळी ठाण्यातील तलावांची सविस्तर माहिती सांगण्यात येणार आहे. शनिवार (ता. २१) सकाळी १० वाजता विज्ञान प्रदर्शनचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या हस्ते होईल. रविवारी (ता. २२) संध्याकाळी ५ वाजता समारोप समारंभ आणि पारितोषिक वितरणाने प्रदर्शनाची सांगता होणार आहे.