अखेर रानगवा जंगलात रवाना
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : गेल्या दोनतीन दिवसांपासून श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ वनक्षेत्रात वावरणाऱ्या रानगव्यास घनदाट जंगलात रवाना करण्यास वन विभागाला यश आले आहे. वन विभागाने राबवलेल्या सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर ही मोहीम फत्ते झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून खोणी परिसरात दर्शन देत असलेला रानगवा हा १८ तारखेला मांगरूळ येथील वनक्षेत्रात सकाळपासूनच मुक्काम ठोकून बसला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने वृक्ष लागवड केलेल्या वनक्षेत्रात हा रानगवा मुक्त विहार करत असताना स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागास कळवले. तात्काळ वनविभागाची रेस्क्यू टीम ही सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व बदलापूर वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे, विठ्ठल दरेकर, रामदास गोरले, राजू शिंदे, अभिमन्यू जाधव व वनरक्षक रवींद्र पाटील, वनमजूर शेलार, स्थानिक ग्रामस्थ मयूर भोईर तसेच रेस्क्यू टीम वॉर एनजीओचे योगेश कांबळे व त्यांचे सहकारी तसेच आपदा व्यवस्थापन टीमचे सुहास पवारसह घटनास्थळावर पोहचले.
...अन् मार्ग मोकळा
लांबून पाहिले असता रानगवा हा पूर्ण वाढ झालेला, शरीराने धष्टपुष्ट असा अंदाजे एक टन वजनाचा भारतीय रानगवा प्रजातीचा असल्याचे रेस्क्यू टीमच्या निदर्शनास आले. रानगवा हा मार्गक्रमण करण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होता, पण सर्व बाजूने लोखंडी जाळीचे कुंपण असल्याने रानगव्यास बाहेर पडण्यास अडचण येत असल्याचे वनाधिकारी यांच्या लक्षात येताच संपूर्ण टीम दिवसभर रानगव्याच्या हालचालींवर संयमाने लक्ष ठेवून होती. हा रानगवा लोकवस्तीच्या दिशेने बाहेर पडला असता तर तो गोंधळून बिथरण्याची शक्यता असल्याने अडकून पडलेल्या रानगव्याला मोकळ्या वनक्षेत्राच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी वनाधिकारी वैभव वाळिंबे यांच्या नेतृत्वाखाली जाळीच्या कुंपणाची एक बाजू उघडण्यात आली आणि त्यातून रानगव्यास घनदाट जंगल क्षेत्राच्या दिशेने कुंपणाबाहेर काढण्यास वन विभागास यश आले आहे.
--------------------------------
रानगवा नैसर्गिक अधिवासात
कुंपणाबाहेर पडल्यावर रानगव्याने जवळच असलेल्या तलावातील पाणी पिले आणि श्रीमलंगगडलगत असलेल्या विस्तीर्ण राखीव वनक्षेत्राच्या दिशेने मार्गक्रमण केले. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत त्याचा मागोवा घेऊन तो लोकवस्तीपासून दूर नैसगिक अधिवासात गेल्याची खात्री झाल्यावरच वनविभाग पथकाने सुटकेचा निश्वास सोडला. बदलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक नातू यांनी सर्व पथकाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.