
मुल्लांच्या वाढदिवसाचे झळकले फलक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना रोखण्यासाठी त्यांच्याच पक्षातील नगरसेवक वेगळी चूल मांडण्याच्या विचारात आहेत. असे असताना, दुसरीकडे आव्हाड यांच्याच पक्षातील माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाचे फलक कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात झळकले आहेत. त्यामुळे उदयास येत असलेल्या मुंब्रा विकास आघाडीचे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे दावेदार तर नाही ना, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
मागील दोन टर्मपासून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघावर जितेंद्र आव्हाड यांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. त्यांचा पराभव करण्यासाठी सर्वपक्षीय मागील निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभेदेखील ठाकले होते; मात्र त्या वेळी ते लाखभराच्या मताधिक्याने निवडून आले. असे असताना, आता आव्हाड यांना रोखण्यासाठी मुंब्रा विकास आघाडी तयार होत असून येत्या काही दिवसांत त्याची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आव्हाड यांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करण्यात येत असल्याचे मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कळवा मुंब्रा मतदारसंघात लावण्यात आलेल्या फलक बाजीवरून दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
--------------
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजबांधवांनी प्रेमापोटी ते बॅनर लावलेले आहेत. दर वर्षी ते बॅनर लावत असतात. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.
- नजीब मुल्ला, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी