भाजप-शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप-शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन
भाजप-शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन

भाजप-शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ ः राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. बीकेसी येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फलकबाजी करण्यात आली होती. शिवाय बेस्टच्या अनेक बसगाड्यांतून भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बीकेसीत दाखल झाले. परिणामी बेस्टच्या दैनंदिन बससेवेवरही मोठा परिणाम झाला होता. त्याशिवाय खासगी बसगाड्यांनीही बाहेरगाववरून हजारो कार्यकर्ते दाखल झाले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकप्रकारे मोदींच्या सभेनिमित्त मोठे शक्तिप्रदर्शन केले.
----
फेरीवाल्यांसाठी विशेष व्यवस्था
पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत फेरीवाल्यांसाठी कर्ज वितरणाच्या योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. फेरीवाल्यांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने त्यांच्यासाठी सभेच्या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
----
धन्यवाद मोदीजी...!
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येत असल्याने त्यांना धन्यवाद देण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘धन्यवाद मोदीजी’ असे हजारो फलक सभास्थळी आणले होते. ‘विकासपुरुष मोदीजी’ म्हणूनही काही फलकांच्या माध्यमातून त्यांचे धन्यवाद मानले जात होते.
----
मोदींना पाहण्यासाठी बघ्यांचीही गर्दी
एकीकडे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी मोठी हजेरी लावली होती; तर दुसरीकडे मोदींना पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही सहभाग होता. दक्षिण कोरियातून मुंबई भेटीला आलेल्या काही पर्यटकांनी सभेच्या ठिकाणी खास हजेरी लावली होती.
---
कमान कोसळल्याने पोलिस जखमी
एमएमआरडीए मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागतासाठी लावलेली कमान मोदींची सभा सुरू होण्यापूर्वी अचानक कोसळली. या घटनेत एक पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळातच ही कमान पूर्ववत बसवण्यात आली. तसेच या घटनेत एका मोटारीचेही नुकसान झाले.