झारखंडच्या महिलेला ‘राजावाडी’त जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झारखंडच्या महिलेला ‘राजावाडी’त जीवदान
झारखंडच्या महिलेला ‘राजावाडी’त जीवदान

झारखंडच्या महिलेला ‘राजावाडी’त जीवदान

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात डीएनबी अभ्यासक्रम सुरू झाल्याने अनेक आजारांवरील अवघड उपचार सोपे झाले आहेत. याचाच प्रत्यय राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या झारखंडच्या महिलेला आला. झारखंड येथील ५२ वर्षीय महिलेला ‘पेम्फिगस’ या दुर्मिळ त्वचाविकारातून जीवदान देण्यात राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले.
झारखंडहून आलेल्या महिलेला ‘पेम्फिगस’ हा दुर्मिळ त्वचाविकार झाला होता. हा आजार एक लाखात जवळपास २० जणांना होतो. यावर पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात; मात्र, राजावाडी रुग्णालयात पहिल्यांदाच यासाठी महागडे इंजेक्शन वापरले गेले. या आजारामुळे महिलेच्या संपूर्ण शरारीवर जखमा झाल्या होत्या. शिवाय त्याचा संसर्ग रक्तातही झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या आजाराचे निदान झाले तेव्हा तो गंभीर स्वरूपात होता. त्यामुळे रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण झाल्याची स्थिती होती. सदर महिलेच्या उपचारांचा खर्च रुग्णालयाच्या निधीतून करण्यात आला.
‘पेम्फिगस’ आजारावरील उपचारासाठी एका विशिष्ट इंजेक्शनची गरज होती; मात्र ही महिला परराज्यातील असल्याने शासकीय योजनेतून महागडे इंजेक्शन मिळवणे कठीण झाले होते. या स्थितीत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाचा निधी वापरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला; तसेच नातेवाईकांनीही तुटपुंजी रक्कम देऊन त्यास हातभार लावला. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणि पुढची गुंतागुंत टळल्यानंतर महिलेला इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर ३७ दिवसांच्या उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. स्वागता तांबे यांनी दिली.
.......
‘पेम्फिगस’ या आजाराचा एखादा रुग्ण तीन ते चार महिन्यांतून एकदा राजावाडीत दाखल होतो. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. राजावाडीतील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आणि त्या महिलेला जीवदान दिले.
- डॉ. विद्या ठाकूर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, उपनगरीय रुग्णालय, महापालिका