
उल्हासनगर शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी निलंबित
उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी प्रभारी प्रशासनाधिकारी हेमंत शेजवळ यांना निलंबित केले. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या आढावा बैठकीची पूर्वतयारी केली नसणे, तसेच प्रशासकीय कारभारावर नियंत्रण नसल्याने कारवाई करण्यात आली.
आयुक्त अजीज शेख यांनी १३ जानेवारी रोजी शिक्षण मंडळाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे निर्देश दिले होते. मात्र शेख हे मंडळाच्या कार्यालयात गेले असताना शेजवळ यांनी बैठकीची कसलीच पूर्वतयारी केली नव्हती. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसून आलेले नाही. शालेय साहित्य, गणवेश, पोषण आहार, शाळा भेटी, त्यांचे नियंत्रण व नियोजन यावर हेमंत शेजवळ यांचे कोणताही अंकुश असल्याचे दिसून आले नाही. शिक्षण विभागास अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतूद असूनसुद्धा आर्थिक वर्ष संपत येत असून निधी वापराबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नव्हते. तसेच आढावा बैठकीमध्ये शेजवळ यांना समाधानकारक उत्तरे देता आली नव्हती. यावरून प्रशासन अधिकारी म्हणून शेजवळ यांचे काहीच नियंत्रण नसल्याचे आढळून आले. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
पाच हजेरी पुस्तके
शिक्षण मंडळामध्ये एकाच विभागाची वेगवेगळी पाच हजेरी पुस्तके आढळली आहेत. ही बाब कार्यालयीन शिस्तीत अनुसरून नसल्याचे समोर आले. तसेच यापूर्वीही शिक्षण विभागातील चोरीचे प्रयत्न, सीसी टीव्ही बंद असणे अशा गंभीर अनियमितता आढळून आल्या होत्या.