डाक विभागाचे मुंबईत पाळणाघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाक विभागाचे मुंबईत पाळणाघर
डाक विभागाचे मुंबईत पाळणाघर

डाक विभागाचे मुंबईत पाळणाघर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : भारतीय डाक विभागाच्या मुंबई क्षेत्रात प्रथमच मुंबई शहरातील दादर (पूर्व), विलेपार्ले, चेंबूर आणि बोरिवली या चार प्रभागांमध्ये शिशुसंगोपन केंद्र (पाळणाघर) सुरू करण्यात आले आहे. या पाळणाघराचे उद्‍घाटन पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २०) करण्यात आले. कार्यालयातून घरापर्यंत तसेच घरातून कार्यालयापर्यंत प्रवास करताना दररोज लागणारा वेळ आणि कामाचे तास यातून महिला कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या प्रेरित आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी शिशुसंगोपन केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले.

मातृत्वलाभ (सुधारणा) कायदा २०१७ अंतर्गत ज्या आस्थापनेमध्ये ५० किंवा त्याहून अधिक महिला कर्मचारी आहेत, अशा कोणत्याही आस्थापनांना शिशुसंगोपन केंद्र सुविधा असावी असा नियम आहे. त्यानुसार मुंबईतील डाक कार्यालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पोस्ट मास्तर जनरल पांडे यांनी त्यासाठी पुढाकार घेत शुक्रवारी चार पाळणाघरांचे उद्‍घाटन केले आहे. लहान मुलांना एकदा कार्यालयाच्या आवारात असलेल्या संगोपन केंद्रात ठेवले की केंद्राच्या प्रशिक्षित महिला प्रभारींद्वारे त्याची काळजी घेतली जाते.

एकूण २६ मुलांना संगोपन केंद्रामध्ये सामावून घेतले जात आहे. आई-वडील दोघेही नोकरी करणारे आणि वडील भारतीय डाक विभागाचे कर्मचारी असलेल्या मुलांनाही संगोपन केंद्रात सामावून घेतले जाणार असल्याचे डाक विभागाने सांगितले आहे. सर्व शिशुसंगोपन केंद्रामध्ये सीसी टीव्ही लावले असून, ते पालकांच्या मोबाईलला जोडले जाऊ शकतात. या केंद्रांमध्ये दोन महिला प्रभारींव्यतिरिक्त, प्रत्येकी २ महिला आया, तात्काळ वैद्यकीय सेवा, प्रथमोपचार सेवा आणि २ वर्षांवरील मुलांना मूलभूत धडे देण्यासाठी शिक्षक उपलब्ध असणार आहेत. याशिवाय मुलांना पौष्टिक आणि आरोग्यदायी जेवण देण्यासाठी प्रत्येक संगोपन केंद्रामध्ये एक स्वयंपाकी आणि प्रत्येकी एक मदतनीस राहणार आहे.

या सुविधा मिळणार
- शिशुसंगोपन केंद्रामध्ये पुरेशी निवासव्यवस्था
- योग्य प्रकाश आणि मोकळी हवा
- स्वच्छ आणि निर्जंतुक स्वच्छतागृह
- खेळण्याची जागा, मेंदू विकसित करणारी खेळणी
- दूरदर्शन आणि प्रशिक्षित महिला परिचारिका

मुलांसाठी, विशेषतः लहान मुलांसाठी सुरक्षित वातावरणाची नितांत गरज आहे. जे कामावर असताना पालकांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत काळजी करण्यापासून मुक्त करेल आणि सोबतच मुलांची योग्य काळजी घेईल. केवळ एक चांगले मानसिक आरोग्य असल्यासच आपण आपल्या कर्मचाऱ्यांकडून १००० वचनबद्धतेची अपेक्षा करू शकतो.
- स्वाती पांडे, पोस्ट मास्तर जनरल, मुंबई