Thur, Feb 2, 2023

महामार्गावर मोकाट गुरांच्या अपघातात वाढ
महामार्गावर मोकाट गुरांच्या अपघातात वाढ
Published on : 21 January 2023, 12:23 pm
कासा, ता. २१ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सध्या मोकाट गुरांचा सुळसुळाट सुरू असून दररोज रात्रीच्या वेळी एका गुराचा अपघाती मृत्यू होत आहे. मनोर ते तलासरीदरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी गुरांचा सुळसुळाट वाढला आहे. रात्रीच्या वेळी अनेक मोकाट गुरे हिरवा चारा खाण्यासाठी महामार्गाजवळील भागात फेरफटका मारत असतात. रात्रीच्या अंधारात लाल किंवा काळी गुरे वाहनचालकांना नीट दिसत नसल्याने अपघाताला बळी पडतात. या मोकाट गुरांमुळे एखाद्या वेळेस लहान वाहनचालकाचा मोठा अपघात होऊ शकतो. महामार्गावर मृत्युमुखी पडलेली जनावरे कित्येक तास बेवारस पडलेली असतात. त्यावर मोकाट कुत्रे ताव मारत असतात. त्यामुळे आणखी अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.