
संक्रमण शिबिरातला सुजित बनला डॉक्टर
प्रकाश लिमये, भाईंदर
घरची आर्थिक स्थिती बेताची, आई घरकाम करते, राहायला संक्रमण शिबिर, कुटुंबात नऊ सदस्य अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत सुजित सोनकांबळे याने आपले डॉक्टर व्हायचे स्वप्न पूर्ण केले आहे. सुजित नुकताच फिजिओथेरपिस्ट झाला आहे. या यशात मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचाही महत्त्वाचा वाटा आहे.
काशी-मिरा भागात डोंगरी येथे राहणाऱ्या सुजितने मिरा-भाईंदर महापालिकेच्या काशी मराठी शाळा क्रमांक चारमध्ये सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुजित आधीपासूनच अभ्यासात हुशार. त्यामुळे त्याने उच्च शिक्षण घ्यावे हा त्याच्या आईचा ध्यास होता. त्यासाठी घरकाम करणाऱ्या आईने पडेल ती मेहनत घेतली. सातवीनंतर सुजितने दहिसर येथील दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, तो राहत असलेल्या भागात महापालिकेने बीएसयूपी योजना सुरू केल्याने कुटुंबाचे स्थलांतर संक्रमण शिबिरात झाले. मात्र सुजितने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला.
आपल्या या यशात आई-वडील, मोठ्या बहिणी, तसेच प्राथमिक शिक्षण घेतलेल्या महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मोठे योगदान असल्याचे सुजित सांगतो. आपण ज्या परिस्थितीतून आलो आहोत त्याचा विचार करून आपल्या शिक्षणाचा उपयोग गोर-गरिबांच्या उपचारासाठी करणार असल्याचे सुजित सांगतो.
....
उच्च शिक्षणाची तयारी
दहावीत ७२ टक्के गुण मिळाल्यानंतर त्याचा वैद्यकीय शिक्षण घेण्याकडे कल वाढला. त्यामुळे त्याने महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यासाठी त्याने ‘नीट’ ची परीक्षा दिली. मात्र पहिला प्रयत्न यशस्वी झाला नाही, यामुळे नाउमेद न होता त्याने पुन्हा प्रयत्न सुरू ठेवला व दुसऱ्या प्रयत्नात त्याला चांगले गुण मिळाले. खरे तर सुजितला एमबीबीएस डॉक्टर व्हायचे होते, पण घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे तो या शाखेत प्रवेश घेऊ शकला नाही. मग सुजितने शिष्यवृत्ती मिळवून बंगळुरू येथील वैद्यकीय शाखेच्या फिजिओथेरपी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला. पाच वर्षे खडतर मेहनत घेतल्यानंतर नुकतीच सुजितला फिजिओथेरपीत पदवी मिळाली आहे. आता तो याच क्षेत्रातील उच्च शिक्षणाची तयारी करत आहे.