
‘अपर दहिसर’ नाव हटविण्याची मागणी
मालाड, ता. २१ (बातमीदार) ः मेट्रो दोन ए दहिसर-अंधेरी पश्चिमच्या मार्गावर दहिसर येथील आनंदनगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकाला आधी ‘अपर दहिसर’ नाव जाहीर करण्यात आले होते. स्थानिकांनी या नावाचा विरोध करून आनंदनगर नावाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते कर्णा अमिन, राजेश पंड्या यांनी पाठपुरावा केला होता. मागणीनुसार एमएमआरडीए आणि दिल्ली मेट्रो प्राधिकरणाने मेट्रो सुरू होण्याआधीच या स्थानकाला नाव बदलून अधिकृत आनंदनगर नावाची स्वीकृती दिली आहे. हे नाव स्थानक आणि प्लॅटफॉर्मच्या फलकावर झळकले; मात्र गुंदवली ते अंधेरी-पश्चिमपर्यंत मेट्रो सेवा सुरू होण्याच्या दिवशीच या स्थानकाच्या इंडिकेटर स्क्रीनवरून आनंदनगर नाव गायब होऊन पुन्हा अपर दहिसर असे दाखवल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान याबाबत माहिती मिळताच कर्णा अमिन, राजेश पंड्या, सुहास धानुका व वसाहतीतील लोकांनी स्टेशन मॅनेजर अरविंद माने यांच्याशी संपर्क साधून इंडिकेटर स्क्रीनवरील अपर दहिसर नाव तत्काळ हटवून आनंदनगर नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे.