तरुणाईमध्ये खादीची क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाईमध्ये खादीची क्रेझ
तरुणाईमध्ये खादीची क्रेझ

तरुणाईमध्ये खादीची क्रेझ

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग

प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजारात सुती, खादी कपडे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. पूर्वी साध्या पद्धतीने शिवण्यात येणाऱ्‍‌या कपड्यांना आता ग्‍लॅमर लूक आला आहे. त्‍यामुळे तरुणाईमध्येही खादीची क्रेझ वाढत आहे. लग्न समारंभात, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सणाच्या दिवशी खादीचे कपडे भाव खात आहेत.
हातमागापासून तयार केलेले कपडे पूर्वी मोजकीच मंडळी वापरायची. खादीचा कपडा वापरणे प्रतिष्ठीचे मानले जात होते. भारतीय हवामानास अनुकूल, वापरण्यास सोयीचे आणि दिसायला साधे-सोज्‍वळ असल्‍याने हल्‍ली दैनंदिन वापरातही अनेकांकडून खादीला प्राधान्य दिले जाते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त खादीचा कुर्ता, लेडीज कुर्ता, ड्रेस मटेरियल, मुलांसाठी धोती-कुर्ता, हातमागावर विणलेल्या साड्या बाजारात दिसून येत आहेत. काही ठिकाणी तर खास हातमागावरील वस्‍तूंचे, खादी महोत्‍सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांकडूनही या कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे.
तरुणाईसह सर्वच वयोगटांमध्ये खादीचे कपडे वापरण्यावर भर दिला जात आहे. खादी वस्तू भांडारामध्ये विविध रंगी शर्ट, जॅकेट घेण्यास पसंती मिळत आहे. खादीवर फुल-हाफ शर्ट, कुर्ता, नेहरू फुल कुर्ता, सुती साडी, मोदी जॅकेट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांची मागणी वाढली आहे. अवघ्‍या १५० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आबालवृद्धांसाठी खादीचे कपडे विक्रीस उपलब्‍ध आहेत. यात खादी कुर्ता- जॅकेट तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

हातमागापासून तयार केलेले कपडे कुठल्याही हंगामात वापरू शकतो. हवामानास अनुकूल, वापरण्यास सोयीस्कर असल्‍याने खादी कपड्यांना मागणी वाढली आहे. खादी महोत्सवालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- अनिल बिरादर, खादी व्यावसायिक

खादी महोत्‍सवाला प्रतिसाद
हातमागापासून तयार केलेल्या खादी कपड्यांना तीन-चार वर्षांपासून मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत खादी कपड्यांचे प्रदर्शन-विक्रीसाठी खादी उत्सवाचे आयोजन केले जाते. उत्सवांमधून तरुणाईसह वेगवेगळ्या वयोगटांतील ग्राहक खादीचे कपडे खरेदीसाठी येतात. हातरुमालापासून वेगवेगळे खादीचे पोशाख, साड्या, बॅग, बेडशीट्‌स, उशांचे कव्हर आदी खरेदी करीत असल्‍याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

कापडी तिरंग्यांना तरुणाईकडून पसंती
प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात तिरंगा, टी-शर्ट विक्रीसाठी आहेत. जिल्ह्यामध्ये काही तरुण मंडळींचा ग्रुप एकत्र येऊन तिरंगा असलेले टी-शर्ट परिधान करण्याला पसंती दर्शवित आहेत. तसेच बाजारात कापडी तिरंगा खरेदीवर भर दिला जात आहे.

सर्वसामान्यांना परवडणारे खादी कपडे
पूर्वी खादी कपडे परिधान करणे मानाचे समजले जात होते. खादीचे कपडे महाग असल्याने सर्वसामान्यांना ते न परवडण्यासारखे होते. मात्र केंद्र सरकारकडून स्‍वदेशी वस्‍तूंना प्राधान्य देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. याशिवाय स्‍टार्टअपच्या माध्यमातून नवोदित उद्योजकांना प्रोत्‍साहन दिले जात आहे. याचा परिणाम खादीच्या खरेदी-विक्रीवरही झाला आहे. खादी कपडे सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आल्‍याने कोट्यवधींची उलाढाल होत आहे.