सकाळ चित्रकला स्‍पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ चित्रकला स्‍पर्धा
सकाळ चित्रकला स्‍पर्धा

सकाळ चित्रकला स्‍पर्धा

sakal_logo
By

बालविकास विद्या मंदिरमध्‍ये चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी नगरसेवकांनी भेट देऊन केले कौतुक
जोगेश्वरी, ता. २३ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्वेतील सर्वोदय नगर येथील बालविकास विद्या मंदिर हायस्कूलमध्ये चित्रकला स्‍पर्धा उत्साहात पार पडली. येथे परिसरातील अनेक शाळांच्या विविध माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांसह पालकांनी रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा केंद्रात प्रवेश घेतला. या वेळी बालविकास विद्या मंदिर शाळेच्‍या खजिनदार सुरक्षा घोसाळकर, सिद्धार्थ इंगळे, वाय. बी. पाटील, सिद्धी कदम, अस्‍मिता शाळेचे पालक प्रतिनिधी किरण कास्‍टे, तोलानी कॉलेजचे विद्यार्थी प्रसाद तर्फे, दीपेश नर, ओमकार मयेकर, वाय. बी. चव्‍हाण इंग्रजी माध्‍यम शाळेच्‍या शिक्षिका निकिता पटेल यांचाही येथे सहभाग लाभला. सर्धा यशस्‍वी व्‍हावी, यासाठी बालविकास शाळा तसेच इतर अनेकांनी व्‍हाॅटस्‌ॲप ग्रुप बनवून मुलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्पर्धेदरम्‍यान शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा नर यांनी भेट देऊन ‘सकाळ’च्‍या या उपक्रमाचे कौतुक केले.

शिवाजी विद्यालयात बालगोपाळांचा मेळा
वडाळा, ता. २२ (बातमीदार) ः काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात सकाळ चित्रकला स्‍पर्धेच्‍या निमित्ताने बाळगोपाळांचा मेळा जमल्‍याचे पाहायला मिळाले. या वेळी पालकही आपल्या पाल्यासह मोठ्या संख्येने हजर होते. शिवाजी विद्यालयात येथे काळाचौकीसह दादर, शिवडी, घोडपदेव, लालबाग, चिंचपोकळी, भायखळा, नायगाव, वडाळा, सायन कोळीवाडा, परळ आदी भागांतील मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. प्रत्येक गटांप्रमाणे विषय देण्यात आले असले, तरीही इतरांच्या तुलनेत सर्वोत्तम चित्र काढण्याची जिद्द मुलांमध्ये दिसून येत होती. मुलांच्या आवडीचे विषय असल्याने मुलांनी वेळेतच चित्रे पूर्ण केली. या स्‍पर्धेसाठी शिवाजी विद्यालयाचे संचालक राजन लोकेगावकर, शुभदा लोकेगावकर, अधिराज लोकेगावकर, चित्रकला शिक्षक मनोहर पेडणेकर, तसेच आयईएस पाटकर गुरुजी प्राथमिक विद्यालयाच्‍या मुख्याध्यापिका संगीता गुट्टे, ज्येष्ठ शिक्षिका शोभना हेगडे, शीला श्रीरामे, शीतल नरोटे, योगेश नाटेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

रंगबेरंगी चित्रांच्या दुनियेत रमले विद्यार्थी
भांडुप (बातमीदार) ः भांडुप पश्चिम येथील अमर कोर विद्यालयात झालेल्‍या चित्रकला स्‍पर्धेत मुले रंगबेरंगी चित्रांच्या दुनियेत रमलेली दिसून आली. अनेक मुलांची चित्रे लक्ष वेधून घेत होती. समाजातील चालू घडामोडींवर आधारित विषयांकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त दिसत होता. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती किती जागृत आहे, हे या स्पर्धांच्या माध्यमातून दिसून आले. या वेळी महाविद्यालाचे मुख्याध्यापक साईनाथ हांडे, अजय पवार आणि शिक्षक उपस्थित होते. दर वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेत असून असेच उपक्रम ‘सकाळ’ने राबावावेत, अशी इच्‍छा मुख्याध्यापक साईनाथ हांडे यांनी या वेळी व्‍यक्‍त केली; तर चित्रकला स्पर्धेतून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा ‘सकाळ’चा उपक्रम कौतुकास्पद असल्‍याचे पालक मंगेश मोहिते यांनी या वेळी सांगितले.

स्पर्धेसाठी चिमुकल्‍यांमध्‍ये उत्‍साह
गोरेगाव (बातमीदार) : गोरेगाव पूर्व येथील निवारा विद्यालयात ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा उत्‍साहात पार पडली. यात इयत्ता पहिली ते डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सकाळी नऊ वाजल्यापासून स्पर्धेस सुरुवात झाली; पण विद्यार्थी उत्साहाने तासभर आधीच केंद्रावर उपस्थित होते. या वेळी मुलांसह पालकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सिद्धार्थ पवार या इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्याने तर सकाळी ८:३० लाच हजेरी लावली. गोरेगावच्या गुरुकुल विद्यालयाच्या शिक्षिका सरोज कांबळे, शीतल गाडगे व गुरुनाथ ताठे हे येथे पर्यवेक्षण करत होते. निवारा विद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी व पाटकर विद्यालयाच्या संजय गिरी यांनी या वेळी मदत केली.

दक्षिण मुंबईतही विद्यार्थ्यांचा उत्साह
मुंबादेवी (बातमीदार) ः लोअर परेल येथील महाराष्ट्र हायस्कूल येथे आयोजित चित्रकला स्पर्धेत दक्षिण मुंबईतील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. गिरगाव येथील चिकित्सक हायस्कूल, डोंगरी येथील ऑर्चिड स्कूल, अंजुमन ए इस्लाम हायस्कूल, कुलाबा म्युनिसिपल स्कूल, मलबार हिल म्युनिसिपल स्कूल, भायखळा येथील मराठी आणि इंग्रजी मध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्साहात चित्रे रंगवित आपल्या कलेचे प्रदर्शन केले. या चित्रकला स्पर्धेच्या पर्यवेक्षिका म्हणून काम पाहणाऱ्या शिक्षिका अंकिता लाखम यांनी विद्यार्थ्यांचे सुहास्य वदनाने स्वागत करीत चित्रकला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आवश्यक त्या सूचना केल्या. महाराष्ट्र हायस्कूलचे चेअरमन डॉ. प्रकाश पाटील म्हणाले की, ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या या चित्रकला स्पर्धेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे हे सुंदरसे व्यासपीठ आहे. मला माझ्या शालेय जीवनातील चित्रकला स्पर्धांची आठवण झाली आणि मन त्या रम्य आठवणीत रमून गेले.

जुळ्या भावंडांचाही सहभाग
चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या दहावीतील विद्यार्थिनी रेशम घाणेकर आणि तिचा जुळा भाऊ रोहन घाणेकर या जुळ्या भावंडांनीही या स्‍पर्धेत आपली कला सादर केली.

श्री गौरीदत्त मित्तल स्कूलमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : सायन येथील श्री गौरीदत्त मित्तल हायस्कूल येथे सकाळपासूनच पालक - विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर गर्दी केली होती. महत्त्‍वाचे म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत सहभागी घेतला होता. या उपक्रमाचे हे ३८ वे वर्ष असून, बहुतांश शाळेतील विद्यार्थी सहभागी होत असलेली ही एकमेव स्पर्धा आहे. यंदाच्या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची सुरुवात सकाळी ९ वाजता झाली; मात्र पालक सकाळी ७ वाजताच आपल्या पाल्यांना घेऊन उपस्थित होते. श्री गौरीदत्त मित्तल विद्यालयसह लायन्स पायोनियर स्कूल, साधना विद्यालय आणि गुरुनानक हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याबाबत श्री गौरीदत्त मित्तल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा मिठापल्ले यांनी सांगितले की, आम्ही दोन दिवसांपासून स्पर्धेची तयारी सुरू केली होती. आमच्या सर्व शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण तयार झाले असून अशा प्रकारची स्पर्धा दरवर्षी आयोजित करायला आवडेल; तर शाळेतील चित्रकला शिक्षिका दीपा पनिकर यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत कलागुण असतात. अशा स्पर्धांमुळे त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते. शिवाय वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधता येतो. यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असल्याचेही त्या म्हणाल्या. या स्पर्धेसाठी सुवरवायझर विनोद पांडे, शिक्षक प्रवीण कटारे, शुभम गाडगे, स्नेहा बरई, प्रवीण नाडार, सुधा कोमलार, रेखा शर्मा, सुजाता, गुरजित, यांच्यासह मदतनीस मारुती सिंग आणि मुन्ना राम यांनी सहकार्य केले. 

चित्रांच्या दुनियेत रंगली मुले
घाटकोपर (बातमीदार) ः विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून उतरणारी चित्रे, वेगवेगळ्या कलाकृती, चित्रांत भरलेले विविध रंग आणि रविवारचा सुट्टीचा दिवस विद्यार्थ्यांनी चित्रांच्या दुनियेत घालवला. सकाळ आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. घाटकोपरच्या सरस्वती विद्या मंदिर शाळेत सकाळीच पहिल्या फेरीतील गटातील इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी स्पर्धा सुरू होण्याच्या वेळेआधीच शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर जमले होते; तर दुसऱ्या फेरीतील इयत्ता पहिली ते दुसरी आणि तिसरी ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साहदेखील उत्स्फूर्त असा होता. स्पर्धेत सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थी वर्गासह ज्ञानप्रकाश विद्यालय, फातिमा हायस्कूल, विद्या भवन हायस्‍कूल, समता बर्वेनगर म्युनिसिपल स्कूल, स्वामी शामानंद हायस्कूल, नॉर्थ बॉम्बे हायस्कूल, आर. एन. गांधी हायस्कूल, सनग्रेस हायस्कूल, महेश्वरी विद्यालय, विकास विद्यालय आदी शाळेतील विद्यार्थीही सरस्वती विद्या मंदिर येथील केंद्रात मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेला सरस्वती विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष विजय पवार, संचालक दीपाली पवार, मुख्याध्यापक जगदीश चौधरी, उपमुख्याध्यापिका वर्षा चौबल, पर्यवेक्षिका राणी मोरे, विदिशा पालये, चंद्रभागा आरोटे, संजय पानसरे, शर्मिला कणसे, गणेश गायकर, अपर्णा फर्नांडिस, जुई श्रीधनकर, ज्योती खेतमल आदींनी विशेष मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी केली.

समता विद्या मंदिर शाळेत उत्‍साह
घाटकोपर (बातमीदार) ः साकीनाका येथील समता विद्या मंदिर येथे झालेल्‍या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थी, पालकांसह शाळेच्या शिक्षकांचाही उत्साह दिसून आला. परीक्षा सुरळीतपणे पार पडावी, यासाठी संस्थेचे सचिव राजेश सुभेदार यांनी सर्व विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुदाम वाघमारे, प्राथमिक विभागाचे चंद्रकांत पाटील, इंग्रजी विभागाचे पर्यवेक्षक अनिल सिंग आणि शिक्षक शंकर नेर्लेकर, सुषमा राऊत, भारती पोवळे, विद्या काळे, गीता बलोदी, प्रतीक्षा गोरे, मोहिनी सावंत, बबिता सिंग, श्रद्धा परब व स्वयंसेवक म्हणून सुसैन तानाजी साहिल, संचित विश्वनाथ मोरे, कुणाल संतोष कवचे, समीर हुसेन शेख, विनीत सुरेंद्र यादव, रहीम फहीम खान यांनी मोलाचे सहकार्य केले.

मूकबधिर विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग
मालाड (बातमीदार) ः सकाळच्या वार्षिक चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मालाड, कांदिवली पश्चिम व पूर्वेतील सेंट जॉर्ज, सेंट जोसेफ, महाराणी सई बाई, स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा इंग्लिश शाळा कांदिवली, आदर्श विद्या मंदिर, पायोनियर हायस्कूल, लीलावती शाळा, डीएव्ही स्कूल, सेंट फ्रांसिस, उत्कर्ष विद्यामंदिर मालाड, जेडीटी सेकंडरी स्कूल या शाळांतील विद्यार्थी मालाड पूर्व येथील उत्‍कर्ष विद्यामंदिर येथे झालेल्‍या स्‍पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कांदिवली पश्चिमेतील डॉ. कुसुम ताई नरावणे मूकबधिर शाळेचे विद्यार्थीही या वेळी सहभागी झाले होते व त्यांनी मनमोहक चित्रे रेखाटली. याप्रसंगी जेडीटी शाळेच्या शिक्षिका स्नेहा पाटील आणि अंजू जाधव तसेच जिजामाता विद्या मंदिरचे शिक्षक शशिकांत सखाराम शिर्के, शिवाजी पाराजी सानप, शीतल पांडुरंग पवार तसेच उत्कर्ष मंदिर शाळा मालाड पश्चिमचे पालक प्रतिनिधी अमोल रेडीज हजर होते. तसेच शिक्षक मनीषा सोष्टे, संध्या ठोंबरे, सायली खरात, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश ढगारे, इमारत पर्यवेक्षक संतोष घाडी व १३ विद्यार्थी यांनी मुख्याध्यापिका पुष्पा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले.

पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्याभवन शाळेत मुलांनी रेखाटली मनसोक्त चित्रे
घाटकोपर (बातमीदार) ः घाटकोपर येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्याभवन शाळेत आपल्या कल्पनाविष्काराने विविध चित्रे रेखाटत बालचित्रकार उत्साहाने ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी घाटकोपर परिसरातील विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच विद्याभवन शाळेत हजेरी लावली. पाण्यातील जग, प्राणी संग्रहालय, वाढदिवसाचा केक, क्रिकेटचा सामना, अशी अनेक मनमोहक चित्रे विद्यार्थ्यांनी साकारली. संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कृ. ना. शिरकांडे, संचालक राजेंद्र बोऱ्हाडे, माध्यमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिनी पोतदार, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश कणसे, इंग्रजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा सावंत त्याचबरोबर चित्रकला शिक्षक संदीप तावडे, अर्जुन मस्के, सुहास गरदडे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.