
रंगात रंगले सारे
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २२ : लहान मुलांचे मन खूपच संवेदनशील असते. आजूबाजूच्या घडामोडी ते बारकाईने पाहत असतात. यातून सुचलेल्या कल्पनांसह त्यांच्या मनातील सृजनशीलतेचा आविष्कार रविवारी (ता. २२) ‘सकाळ समूहा’तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत दिसून आला. इयत्ता पहिले ते आजी-आजोबांच्या वयोगटासाठी आयोजित स्पर्धेला रायगड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यात नऊ केंद्रांवर स्पर्धा घेण्यात आली. दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडलेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’ची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत होते. रविवार, सुटीचा दिवस असतानाही सकाळपासून ठरवून दिलेल्या स्पर्धा केंद्रांवर विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू होती. दप्तरात पेन्सिल, रंगाच्या पेट्या, पाण्याची बाटली घेऊन विद्यार्थी केंद्रावर हजर झाले होते. त्यांचा उत्साह अमाप होता, जो त्यांच्या चित्रकौशल्यातूनही दिसून आला. पहिली आणि दुसरीच्या ‘अ’ गटासाठी वाढदिवसाचा केक, माझे आवडते कार्टुनमधील पात्र, मास्क आणि मी आणि प्राणिसंग्राहलय असे विषय होते. सर्वांनाच वाढदिवसाचा केक आवडतो, त्यामुळे हे चित्र काढण्याचा प्रयत्न या गटातील मुले करताना दिसली. त्याचबरोबर कोरोना कालावधीतील वाईट दिवसांच्या आठवणी कागदावर उतरवताना त्यांची कल्पनाशक्ती, सृजनशीलता दिसून आली. इयत्ता तिसरी, चौथीच्या मुलांनीही फिश टॅंकमधील मासे, ऑनलाईन शाळा कागदावर उतरवल्या. सर्वात जास्त स्पर्धकांची संख्या पाचवी ते सातवीच्या ‘क’ गटातील विद्यार्थ्यांची होती. अगदी लहानांपासून वयोवृद्ध आजी-आजोबांसाठी आयोजित स्पर्धेला रायगड जिल्ह्यात भरभरून प्रतिसाद मिळाला.