पम्पिंग स्टेशनसाठी मिठागराची जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पम्पिंग स्टेशनसाठी मिठागराची जागा
पम्पिंग स्टेशनसाठी मिठागराची जागा

पम्पिंग स्टेशनसाठी मिठागराची जागा

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : माहुल पम्पिंग स्टेशनसाठी केंद्र सरकारने मिठागराची सुमारे ६ एकर जागा देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे पम्पिंग स्टेशनचा रखडलेला मार्ग मोकळा झाला आहे. या जागेसाठी पालिकेला बाजारभावानुसार मीठ आयोगाला ११८ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

मुंबईतील २६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर स्थापन करण्यात आलेल्या चितळे कमिटीच्या अहवालानुसार पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या माहुल मिठागराच्या जमिनीवर पम्पिंग स्टेशन बांधण्याचे ठरवले होते. जमीन हस्तांतरणासाठी पालिकेने मिठ आयुक्तांकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनदेखील त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पालिकेच्या विनंतीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२०मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर माहुल पम्पिंग स्टेशनचा प्रश्न निकाली निघाला आहे. स्टेशनसाठी लागणारी मिठागराची ६ एकर जागा मुंबई महापालिकेला देण्याची तयारी केंद्रीय मिठ आयोगाने दर्शवली आहे. बीपीटी रोडच्या बाजूने माहुल खाडी, वडाळा येथे माहुल नाल्याजवळ हे पम्पिंग स्टेशन उभारले जाणार आहे. नाला, खाडी जवळ असल्याने अतिवृष्टीत या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी उपसून बाहेर फेकणे शक्य होणार आहे. या स्टेशनमुळे माटुंगा, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, शीव, नेहरूनगर, सिंधी सोसायटी, चेंबूर, कुर्ला परिसरात तुंबणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.