
आफ्रिकन महिलेवर मुंबईत उपचार
दुर्मिळ फुप्फुस विकारावर प्रत्यारोपणाचा पर्याय
आफ्रिकन महिलेवर मुंबईत उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : एका आफ्रिकन महिलेवर मुंबईतील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना उपचार करण्यात यश आले. डॉक्टरांच्या टीमने सिस्टिक फायब्रोसिस आणि पल्मोनरी हायपरटेन्शनमुळे गेल्या ५ वर्षांपासून ऑक्सिजन थेरपीवर असलेल्या ३६ वर्षीय सेशेल्स (अफ्रिकन) महिलेवर आव्हानात्मक आणि अवघड अशी यशस्वी दुहेरी फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. या रुग्णाला जन्मतः फुप्फुस आणि हृदयाला जोडणारी एकच रक्तवाहिनी होती.
सुरुवातीला श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवल्याने रुग्णाला २०१८ मध्ये स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि तेव्हापासून ती ऑक्सिजन थेरपीवर होती. तिला सिस्टिक फायब्रोसिस असल्याचे निदान झाले. ज्या स्थितीत फुप्फुसावर सर्वांत जास्त परिणाम होतो आणि आजार जसजसा वाढत जातो तसतसे श्वासोच्छ्वासाचा त्रास, तीव्र प्रमाणात खोकला, छातीत घरघर, सायनोसिस, खोकल्यातून रक्त येणे, फुफ्फुसाचा हृदयरोग आदी लक्षणे दिसून येतात. एवढेच नाही, तर या रुग्णाला फुप्फुसाचा उच्च रक्तदाब (फुप्फुसातील धमन्यांवर आणि हृदयाच्या उजव्या बाजूला प्रभावित करणारा उच्च रक्तदाबाचा प्रकार) देखील आढळला. अशा परिस्थितीत हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकता असते, कारण दोन्ही अवयव निकामी झालेले असतात. परेल येथील ग्लोबल हॉस्पिटल्स येथे तिची अनेक चाचण्यांनंतर दुहेरी फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉ. समीर गर्दे यांनी सांगितले, की अशा प्रकरणांमध्ये फुप्फुसांचे प्रत्यारोपण महत्त्वाचे असते. फुप्फुस प्रत्यारोपण ही सर्वांत आव्हानात्मक शस्त्रक्रिया आहे. रुग्ण मूळचा आफ्रिकन असून भारतीय फुप्फुसांचे प्रत्यारोपण हेदेखील रोगप्रतिकारक क्षमतेच्या दृष्टीने एक आव्हानात्मक होते.
रुग्णाच्या फुप्फुसांना हृदयाशी जोडणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जन्मजात समस्या होती. साधारणपणे प्रत्येक फुप्फुस हृदयाच्या वरच्या कक्षाशी दोन नसांनी जोडलेले असते. त्याचा आकार प्रत्येकी १ ते १.५ सेंमी असतो. या रुग्णाकडे मात्र अंदाजे २ सेंमीची एकच रक्तवाहिनी होती. रक्तदात्याकडे मात्र २ शिरा होत्या आणि शस्त्रक्रियेचे मुख्य आव्हान होते, की दोन शिरा एका शिरेशी अशा प्रकारे जुळवणे की प्रवाहात अडथळा येणार नाही, पण आम्ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
- डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, वरिष्ठ लंग ट्रान्सप्लांट सर्जन