जव्हार तालुक्याची तहान भागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हार तालुक्याची तहान भागणार
जव्हार तालुक्याची तहान भागणार

जव्हार तालुक्याची तहान भागणार

sakal_logo
By

जव्हार, ता. २४ (बातमीदार) : समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवर असलेल्या आणि भौगोलिक दृष्ट्या उंच टेकड्या आणि डोंगराळ क्षेत्रफळामुळे जव्हार तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होते; मात्र या वर्षी शासनाने गाव पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी पाऊल पुढे टाकत जलजीवन मिशन, हर घर पाणी योजनेतून तालुक्यात १०६ कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या घरात पाणी पोहचण्यासाठी हर घर पाणी योजनेतून पाईप लाईनची कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. यामुळे गावे होणार पाणी टंचाईमुक्त आणि योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी, यंत्रणा कामाला लागली आहे.
जलजीवन योजनेतून ७८ गावांना हर घर पाणी योजनेसाठी कार्यादेश कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ४५ गावांतील हर घर पाणी योजनांच्या कामांनादेखील सुरुवात झाली आहे; मात्र त्यातील ३३ गावांतील योजनांची अद्याप कामे सुरू झाली नाहीत. उर्वरित गावांच्या पाणी योजना सुरू करण्यासाठी वन विभागाचा अडथळा आहे. शासकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेपानंतर या अडचणी दूर होण्यासाठी प्रयत्न सुरू असून यात यश मिळेल असे बोलले जात आहे.
पाणी पोहचण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपसभापती, सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ठेकेदारांनी मोठ्या थाटामाटात हर घर पाणी योजनेचे उद्घाटन केले असून, कामांनाही सुरुवात झाली आहे. एकंदरीत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमधील पाण्याचा प्रश्न मिटून टँकरवर होणारा खर्च कमी व्हावा, अशी आशा तालुक्यातील नागरिक करीत आहेत.

पाण्यासाठीची पायपीट थांबणार
तालुक्यातील भीषण पाणीटंचाई असलेली गावांची नोंद पाणीपुरवठा विभागाकडे आहे. यामध्ये दादरकोपरा, खरंबा, पवारपाडा, रिठीपाडा, सगपाणा माळघर, दापटी, बरवाडपाडा, घिवंडा अशा शेकडो गावांना उन्हाळ्यात दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो; मात्र जलजीवन, हर घर पाणी योजनेमुळे या वर्षानंतर या ग्रामस्थांना विशेष करून महिला वर्गाला पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही. जलजीवन योजनेतून नळाद्वारे सर्व घरांना पाणी मिळणार असल्यामुळे आदिवासी वस्त्यांची अनेक वर्षांची पाणीटंचाई दूर होणार आहे.