माघी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माघी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर
माघी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

माघी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

sakal_logo
By

मागील वर्षीची परवानगी ग्राह्य धरून परवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : यंदाचा माघी गणेशोत्सव उद्या २५ जानेवारीपासून साजरा होणार आहे. या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेकडून सूचना जाहीर करण्यात आली आहे. रीतसर परवानगी घेऊनच मंडळांनी उत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
येत्या माघी गणेशोत्सवादरम्यान असलेला अल्प कालावधी व त्यानंतर लगेचच साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्यामुळे ज्या मंडळांना गतवर्षी परवानगी देण्यात आली आहे, अशा मंडळांचे अर्ज स्थानिक आणि वाहतूक पोलिसांकडे न पाठवता, मागील वर्षीची परवानगी ग्राह्य धरून विभाग कार्यालयांमार्फत छाननी करून परवानगी देण्यात येणार आहे. नव्याने तसेच प्रथमतः अर्ज करणाऱ्या मंडळांच्या अर्जांच्या बाबतीत मात्र स्थानिक आणि वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
विभागीय सहायक आयुक्त यांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागात माघी गणेशोत्सवादरम्यान उभारावयाच्या कृत्रिम तलावांबाबत आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार यथायोग्य सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल. माघी गणेशोत्सवादरम्यान मंडप उभारणीच्या परवानगीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे असंगणकीय कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

हे आहेत नियम
कोविड-१९ किंवा त्या अनुषंगिक विविध प्रकारांच्या प्रादुर्भावाचा किंवा पुनरुद्भवाचा संभाव्य धोका विचारात घेता, शासनाने उत्सव कालावधीत ‘कोविड – १९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केल्यास, सदर परिस्थितीत त्यांचे पालन केले जाईल, अशा आशयाचे हमीपत्र मंडळांकडून स्वीकारणे आवश्यक असेल.
महानगरपालिका आयुक्तांनी माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. यास्तव, फक्त याच वर्षापुरते माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्‍‌या मंडपांसाठी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास मंजुरी दिली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील माघी श्री गणेशोत्सवादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस दल यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्‍‌या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.