अर्ध्या मुंबईचा पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्ध्या मुंबईचा पाणीपुरवठा बंद
अर्ध्या मुंबईचा पाणीपुरवठा बंद

अर्ध्या मुंबईचा पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ ः मुंबईत भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महापालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जलवाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसवणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि दोन ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे शहरात निम्म्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
३० जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत २४ विभागांपैकी १२ विभागांतील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. दोन विभागांतील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.
पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या नऊ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागांतदेखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. शहर भागात ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या दोन विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ यादरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारीला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. २९ जानेवारी २०२३ तसेच ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी यादरम्यान उपरोक्त विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.