
शरीर संपदेचा छंद बाळगणारा पोलिस कॉन्स्टेबल
शामकांत पतंगराव, किन्हवली
सतत आव्हानांना सामोरे जावे लागत असलेल्या पोलिस दलात कर्तव्याबरोबरच निरोगी शरीरालाही फार महत्त्व द्यावे लागते. वेळेवर संतुलित आहार व व्यायाम, मैदानी खेळ यामुळे शरीरयष्टी सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे अवलोकन तरुणांनीही करावे, असा सल्ला ठाणे शहर पोलिस दलात कॉन्स्टेबलपदी कार्यरत असलेले विकास फर्डे यांनी दिला आहे. आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवता त्यांनी शरीरसौष्ठवसारख्या खेळाचा छंद जोपासला आहे.
------------------------------------------------------------
ठाणे शहर पोलिस दलात मुख्यालय क्रीडा विभागात कॉन्स्टेबल पदावर रुजू असलेले विकास फर्डे हे कर्तव्य बजावतानाही आपल्या शरीरयष्टीकडे विशेष लक्ष देतात. संतुलित आहाराबाबत अत्यंत काटेकोरपणे पालन करत असताना इतर तरुणांनीसुद्धा याचे अवलोकन करावे, असा सल्लाही देतात. शरीर निरोगी असेल तरच पोलिस दलात काम करताना अनेक आव्हानांना सहज सामोरे जाता येते याची कल्पना असल्यानेच विकास यांनी शरीरसंपदा बळकट ठेवण्याचा छंद जोपासला आहे.
शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील चेरवली येथील रहिवासी असलेले विकास फर्डे यांना साहसी खेळातील सहभाग व व्यायामाचा वारसा पेशाने प्राथमिक शिक्षक असलेल्या वडिलांकडून मिळाला. किन्हवली येथील शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालयात दहावी आणि शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयात बारावी विज्ञानपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सरळगाव कृषी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण सुरू असतानाच पोलिस दलात भरतीसाठी दाखल झाले. दरम्यानच्या काळात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक सुनील केदार व मधुकर पडवळ यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
२१ सप्टेंबर २०१६ ला ठाणे शहर पोलिस दलात भरती झाल्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात नऊ महिने प्रशिक्षण घेत असताना शरीरयष्टीकडे विशेष लक्ष देता आले.
शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारात विशेष रस असल्याचे हेरलेल्या ठाणे पोलिस दलातील उपनिरीक्षक स्नेहा करनाळे यांच्या प्रेरणेने योगेश चौधरी, संतोष शुक्ला आणि हेमंत भोईर या तज्ज्ञ शरीरसौष्ठव प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्रशिक्षण सुरू असून, ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघाचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
ब्राँझ पदकाचा मानकरी
महाराष्ट्र राज्य पोलिस दलाकडून पुणे येथे ७ ते १३ जानेवारी या काळात घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत शरीरसौष्ठव, ७० किलो गट या प्रकारात विकास फर्डे यांस ब्राँझ पदक प्राप्त झाले असून, आगामी राष्ट्रीय बॉडी बिल्डर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शरीरसौष्ठव हा क्रीडा प्रकार माझ्या आवडीचा असून पोलिस दलात कार्य करत असतानाच जर संधी मिळाली तर त्यात यश संपादन करून पोलिस दलाचे नाव उंचाविण्याचा मानस विकासने व्यक्त केला आहे.
---------------------------------------------------
शरीरयष्टी कमविण्यासाठी प्रत्येक तरुणाने स्वतःला व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे, तसेच वेळेवर योग्य आहार आणि शरीराची काळजी घेतली पाहिजे.
- विकास फर्डे, पोलिस कॉन्स्टेबल, ठाणे शहर पोलिस
(मुख्यालय, क्रीडा विभाग)