
प्लास्टिक पिशव्यांमुळे दणका
वाशी, ता. २५ (बातमीदार) : ऐरोली जी विभागात काही व्यावसायिक अनधिकृत सिंगल युज प्लास्टिकचा वापर करत होते. अशा बारा व्यावसायिकांवर नवी मुंबई महापालिकेच्या प्लास्टिकविरोधी पथकाने सोमवारी (ता. २३) दंडात्मक कारवाई केली.
सिंगल युज प्लास्टिक वापरण्यास बंदी असतानाही काही ठिकाणी त्याची विक्री केली जात आहे. ऐरोलीमध्येही काही व्यावसायिक अनधिकृतपणे सिंगल युज प्लास्टिकची विक्री करत असल्याची माहिती पालिकेच्या प्लास्टिकविरोधी पथकाला मिळाली होती. त्याअनुषंगाने पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपआयुक्त परिमंडळ २ चे अमरिश पटनिगरे यांच्या सूचनेनुसार ऐरोली विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक सुभाष म्हसे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी १२ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जवळपास ३५ किलोचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. दैनंदिन वापरात सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा आणि कापडी, कागदी पिशव्यांचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन करत महापालिकेने यापुढेही अशा प्रकारे दंडात्मक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कापडी पिशव्यांचे वाटप
ऐरोली विभाग कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या पालिकेच्या १५ विभागांमध्ये ५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये, अशी समज ग्राहकांना देत पालिकेकडून कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करून जनजागृती करण्यात आली. या वेळी ऐरोलीचे विभाग अधिकारी तथा सहायक आयुक्त महेंद्र सप्रे, स्वच्छता अधिकारी सुभाष म्हसे उपस्थित होते.