
डिजिटल युगात हस्ताक्षराचा वापर शून्य
जव्हार, ता. ९ (बातमीदार) : डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक बाबी या पेपरलेस झाल्या आहेत. शिवाय कोरोना काळात शाळा बंद असताना इंटरनेट, ५ जी स्पीड आणि शासकीय कार्यालयातील पेपरलेस कार्यपद्धती आणि समाज माध्यमांची वाढती लोकप्रियता या सगळ्यामुळे हातात पेन घेऊन लिहिण्याची सवय तुटत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर सुधारण्यावर परिणाम झाला आहे.
डिजिटल युग पाहता भविष्यात हस्ताक्षर कला लोप पावते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच हस्तलेखनाला चालना देण्याची आज गरज असल्याची अपेक्षा सुलेखनाची चळवळ चालवणाऱ्या हस्ताक्षरतज्ज्ञ तसेच गुरुजनांकडून व्यक्त करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या युगात अँड्रॉइड मोबाईलच्या मदतीने; तर व्हाईस टायपिंग करणे अधिक सोयीचे झाले आहे. कॉम्प्युटरच्या की-बोर्डवर टायपिंग फटाफट करा; पण सुंदर अन् वळणदार हस्ताक्षराला जिवंत ठेवूया, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.
जगभरातील हस्ताक्षरप्रेमी जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून साजरा करतात. या डिजिटल युगात हस्ताक्षर कला लोप पावते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या कलेचे संवर्धन करण्यासाठी हस्ताक्षरप्रेमींनी हस्ताक्षर सौंदर्य अधिक बहरावे, याकरिता शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
---------------
सुंदर हस्ताक्षर एक दागिना
असे म्हटले जाते की, अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव कळतो. त्यामुळे हस्ताक्षर सुंदर असणे किंवा व्हावे याकरिता घरातून, मित्रवर्गातून, शाळेतून प्रयत्न व्हायला हवेत. लिहिताना शक्यतो शाईचे पेन वापरा. सुंदर अक्षर शिकताना उभ्या, आडव्या, तिरप्या रेषांचा दररोज सराव करावा. पेन्सिलने लिहिताना टोकदार पेन्सिल वापरावी. एका ओळीत सहा ते सात शब्द लिहा, अक्षर बारीक असल्यास सात ते दहा शब्द लिहा. शाईपेनाने लेखन करताना पेनावर अतिरिक्त दाब देऊ नये, शुभेच्छा देताना स्वहस्ताक्षरात किंवा पत्रांद्वारे द्याव्यात. दररोज २५ ते ३० ओळी लिहिण्याचा सराव नक्की करा, असे आवाहन सुंदर हस्ताक्षर चळवळीचे शैलेश बैसाने यांनी सांगितले.
-------------
शालेय विद्यार्थी, पालक यांनी लिहिते राहावे, हाताने लिहिण्याचे शास्त्रीयदृष्ट्या असंख्य फायदे आहेत. हाताने लिहिताना मेंदूचा वापर अधिक होतो. नवनवीन विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि बौद्धिक जडणघडणही चांगली होते.
- शैलेश बैसाने, सदस्य, सुंदर हस्ताक्षर चळवळ