
चिंचणीच्या सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
डहाणू, ता. २५ (बातमीदार) : चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश दुबळा यांच्यावर १७ सदस्यीय ग्रामपंचायतीमधील एका गटाने आणलेला अविश्वाचा प्रस्ताव डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी फेटाळून लावला आहे.
चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश दुबळा यांच्यावर ग्रामपंचायतीच्या एका गटाने १६ जानेवारी २०२३ रोजी अविश्वाच्या प्रस्तावाचे निवेदन डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्याकडे सादर केला होता. त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी सभा घण्याकरिता २३ जानेवारी २०२३ रोजी निवेदन दिले होते; मात्र चिंचणी ग्रामपंचायतीची मुदत २३ एप्रिल २०२३ रोजी संपत असून सरपंचाची निवडणूक २० जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५ नुसार अविश्वासाचा प्रस्ताव हा सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या निवडणुकीच्या दिनांकपासून दोन वर्षाच्या कालावधीच्या आत आणि ग्रामपंचायतीची मुदत समाप्त होणाऱ्या दिनांकाच्या लगतपूर्वीच्या सहा महिने कालावधीच्या आत कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव आणता येत नाही. हे कारण दाखवत डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश दुबळा यांच्यावर आणलेला अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे पत्र चिंचणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंजुषा चुरी आणि इतर पंधरा सदस्यांना पत्राने तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी कळवले आहे.