अंधेरीत इमारतीच्या २४ व्या मजल्यावर आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरीत इमारतीच्या २४ व्या मजल्यावर आग
अंधेरीत इमारतीच्या २४ व्या मजल्यावर आग

अंधेरीत इमारतीच्या २४ व्या मजल्यावर आग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील २८ मजली इमारतीच्या २४ व्या मजल्यावर मंगळवारी (ता. २४) मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने आगीचे लोट २३ व्या मजल्यापर्यंत पसरले. यात धुराचा त्रास झाल्याने चार जण जखमी झाले असून, त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिषेक सिंग दुहान (३९), चंद्रमोहिनी कौशल (७५), शिरीन मोतीवाला (८५), चिटवान कौशल (३४) अशी जखमींची नावे आहेत. अग्निशमन दलाला पहाटे पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ‘शिवशक्ती भवन’ या २८ मजली इमारतीत रात्री दीडच्या सुमारास केबलला अचानक आग लागली. मध्यरात्री रहिवासी गाढ झोपेत असताना ही आग लागल्याने अनेकांची धावपळ उडाली. आग २४ व्या मजल्यावर लागली; मात्र आग भडकल्याने धुराचे लोट खालच्या २३ व्या मजल्यावर पसरल्याने अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. धुरातून बाहेर पडताना गुदमरल्याने चार जण जखमी झाले. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. इतर मजल्यांवर आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने खबरदारी घेतल्याने अनेकांचे जीव वाचले. या घटनेची पोलिस, अग्निशमन दलाकडून चौकशी केली जात आहे.