पालिकेच्या सुरक्षा दलास संचलनाचे पारितोषिक प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या सुरक्षा दलास संचलनाचे पारितोषिक प्रदान
पालिकेच्या सुरक्षा दलास संचलनाचे पारितोषिक प्रदान

पालिकेच्या सुरक्षा दलास संचलनाचे पारितोषिक प्रदान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : महाराष्ट्र दिनी राज्यस्तरीय पथ संचलन सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट पथ संचलनाचे द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलास जाहीर झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मंगळवारी (ता. २४) आयोजित एका विशेष सोहळ्यादरम्यान अप्पर पोलिस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंह यांच्या हस्ते आणि पोलिस सह आयुक्त (प्रशासन) मुंबई एस. जयकुमार आणि अप्पर पोलिस आयुक्त (सशस्त्र पोलिस दल) आरती सिंह यांच्या उपस्थितीत ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
दरवर्षी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी दादर पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित होतो. राज्यपालांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यादरम्यान विविध गणवेशधारी दलांच्या पथकांचे पथसंचलनदेखील मोठ्या जोशात व उत्साहात होत असते. यामध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलाचाही सहभाग असतो. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२२ रोजीच्या पथ संचलनादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ७२ सुरक्षा रक्षकांचा समावेश असलेल्या पथकानेही भाग घेतला होता. या पथकाचे नेतृत्व विभागीय सुरक्षा अधिकारी सुनील होळकर, सहायक सुरक्षा अधिकारी संदीप मुळे व सहायक सुरक्षा अधिकारी नितीन महाजन यांनी केले होते. या संचलनाकरिता महापालिकेच्या सुरक्षा दलाचे प्रशिक्षक छोटू साळुंखे, रवींद्र परदेशी व दिगंबर अमोदकर यांनी पथ संचलनात सहभागी झालेल्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण दिले व सराव करवून घेतला. हे तिन्ही प्रशिक्षक भारतीय सैनदलातील सेवानिवृत्त जवान आहेत.