दादरमध्‍ये कलेच्या प्रतिभेचा महासंगम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादरमध्‍ये कलेच्या प्रतिभेचा महासंगम
दादरमध्‍ये कलेच्या प्रतिभेचा महासंगम

दादरमध्‍ये कलेच्या प्रतिभेचा महासंगम

sakal_logo
By

दादरमध्‍ये कलेच्या प्रतिभेचा महासंगम
छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल
जीवन तांबे, चेंबूर
‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर’ हा पत्ता एका सर्वसाक्षी ऐतिहासिक स्थळाचा तर आहेच, पण तो पत्ता आहे महाराष्ट्रातल्या असीम कलाऊर्जेचा, नव्या कला जाणिवांचा आणि सळसळत्या कल्पक तरुणाईचा. या तरुणाईला आणि कलावंतांना खरीखुरी दाद दिली आणि साद घातली ती राज्याचे माजी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी. त्यांच्याच संकल्पनेतून ‘वेध’ आणि ‘आम्ही दादरकर’ या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून २०२२ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल’चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी हाच महोत्सव त्याच ऊर्जेने, भव्यतेने आणि आत्मविश्वासाने २ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर’ येथे होणार आहे.
गेल्या वर्षी कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा यांची सांगड घालणाऱ्या या कलामहोत्सवाने कलाप्रेमी मुंबईकरांना आकर्षित केले होते. खाद्य महोत्सवाची मेजवानी, सृजनशील कलाकृती, रसिकांना मुग्ध करणारी संगीत संध्या, लहान मुलांना प्रोत्साहन देणारी कलाशिबिरे यांनी रसिकांना तृप्त केले होते. तीच तृप्तता यंदाचीही खासियत असणार आहे. हा संकल्पित महोत्सव सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्यातल्या वनिता समाजात आयोजित करण्यात येणाऱ्या नावाजलेल्या चित्रकारांच्या ‘कलाक्षितिज आर्ट गॅलरीकडे रसिकांचे पाय आपोआप वळतील असा अंदाज आहे. कलात्मक वस्तूंचे शॉपिंग स्टॉल्स, लहानग्यांसाठी कला शिबिरांचे आयोजन या उपक्रमांच्या सोबतीने जे. के. अकॅडमीतर्फे घेण्यात येणारी निसर्ग चित्रण स्पर्धा, मंथन अकॅडमी आयोजित छायाचित्रण स्पर्धा म्हणजे कलेचा उत्कर्षबिंदू ठरणार आहेत. ‘मंथन अकॅडमी’तर्फे घेण्यात येणाऱ्या डुडल या उपक्रमामध्ये कलात्मकतेविषयी, तसेच कला व जाहिरात क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर चर्चासत्रांचा समावेश आहे.

कलामहोत्सवाचे आकर्षण
महोत्सवाचे चारही दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची समकालीन परदेशी चित्रकारांनी काढलेली व सध्या जर्मनी, फ्रान्स, रशिया, इंग्लंड या देशांमध्ये असणाऱ्या मूळ चित्रांच्या प्रतिमा प्रथमच मुंबईकरांना पाहता येतील. याचबरोबर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराण्याकडे असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र कवड्यांची माळ, छत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी पाडलेले सुवर्ण होन नाणे मुंबईकरांना पाहता येणार आहे. दादरकरांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘दादर गॉट टॅलेंट’ ही नृत्य आणि गायन स्पर्धाही होणार आहे. ‘कलांगण’ या संस्थेचा ‘लोकगाथा’ हा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. लिटिल स्टार हा बृहन्मुंबई महापालिकेच्या व दादरमधील शाळेतील विद्यार्थ्यांचा गाणी व नृत्य कार्यक्रम कलासागरच्या मंचावर होईल. तसेच ‘आठवणीतले दादर’ उपक्रमाचा समावेश या कलामहोत्सवामध्ये असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल ही मुंबईकरांसाठी मोठी पर्वणी आहे. या महोत्‍सवात मुंबईकरांना विविध कला जवळून पाहता येतील. अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या कलामहोत्सवामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी होऊन त्‍याचा आनंद घ्यावा.
- साईनाथ दुर्गे, अध्यक्ष, वेध फाऊंडेशन